पुणे : खेड तालुका पंचायत समितीचे शिवसेनेचे विद्यमान सभापती भगवान पोखरकर यांनी त्यांच्याच पक्षाच्या महिला आणि पुरुष सदस्यांवर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
पुण्यातील डोणजे गाव परिसरातील डोंगरावरील एका खासगी रेसॉर्ट हा जीव घेणा हल्ला करण्यात आला आहे. भगवान पोखरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या हल्ल्याची धक्कादायक दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्या मध्ये कैद झाली आहेत. या हल्ल्यात दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. भगवान नारायण पोखरकर व जालिंदर नारायण पोखरकर व इतर काही जण गाड्यातून खडकवासला परिसरातील या रिसॉर्टमध्ये आले. त्यांनी हॉटेलचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी पिस्तुल, लोखंडी हत्यारासह हॉटेलच्या खोल्यांमध्ये जाऊन तेथे असणार्या सदस्यांना मारहाण केली. त्यात प्रसाद शरद काळे यांच्या हाताच्या बोटाला जखम झाली आहे. तसेच भगवान पोखरकर यांनी हवेत गोळीबार केला आहे. हवेली पोलिसांनी भगवान पोरखकर व जालींदर पोखरकर यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
काय आहे प्रकरण...
पंचायत समिती सभापती पदाच्या निवडणूकिवरून हा वाद झाल्याची माहिती समोर येते आहे. भगवान पोखरकर यांचा अध्यक्ष पदाचा कार्यकाळ संपल्या नंतरही ते इतर सदस्यांना संधी देत नव्हते. म्हणून पंचायत समितीच्या सदस्य असलेल्या सविता सांडभोर यांनी इतर सहा सदस्यांसोबत मिळून पोखरकर विरुद्ध अविश्वास ठराव दाखल केला.
त्या ठरावाच्या बाजूने येत्या ३१ तारखेला मतदान होणार होते. त्यामुळे ठराव मांडणारे सर्व सदस्य एका खासगी रिसॉर्ट मध्ये थांबले होते. मात्र ही माहिती पोखरकर यांना मिळाली आणि त्यांनी रात्री आपला भाऊ आणि कार्यकर्त्यां सोबत येऊन आमच्यावर बंदूक, कोयता आणि लोखंडी गजानी जीवघेणा हल्ला केला, अशी तक्रार सांडभोर यांनी दिली आहे. या घटनेमुळे खेडचं राजकीय वातावरण तापलं असून पुणे ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.