याबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार: मागील महिन्यात पुणे-नाशिक महामार्गावर थिगळस्थळ येथे रात्रीच्या सुमारास दोघांनी दुचाकीवर येऊन टेम्पो अडवून चालकाचा मोबाईल व रोख रक्कम १० हजार रुपये हिसकावून बळजबरीने नेली होती. याबाबत टेम्पोचालकाने खेड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दिली होती. सदर गुन्ह्याचा तपास चालू होता. दि. १३ रोजी सहायक पोलीस निरीक्षक राहुल लाड, पोलीस हवालदार सचिन गिलबिले, सचिन जतकर, पोलीस अंमलदार निखिल गिरिगोसावी, स्वप्रील गाढवे हे राजगुरुनगर शहरामध्ये पेट्रोलिंग करीत असताना त्यांना पाबळ चौकामध्ये पांढरे रंगाची कार मंचर बाजूकडून जोरात भरधाव वेगात आली. त्या गाडीस पोलिसांनी थांबविण्याचा इशारा केला असता त्यावरील चालकाने कार न थांबविता तो पाबळ बाजूकडे भरधाव वेगात पळवून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. त्याचा पाठलाग करून त्यास पकडून त्याचे नाव-पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव गौरव शिवराम गायकवाड (वय २०, रा. खरपुडी बुद्रुक, ता. खेड) असे असल्याचे सांगितले. त्या वेळी त्यास ताब्यात घेऊन कारबाबत अधिक चौकशी करून पोलिसीखाक्या दाखविताच त्याचे साथीदार ओमकार रोहिदास गायकवाड, संकेश तुळशीराम गायकवाड( दोघे रा. खरपुडी बुद्रुक, ता. खेड) मदतीने पुणे-नाशिक महामार्गावर टेम्पो अडवून ड्रायव्हरच्या ताब्यातील एक मोबाईल व रोख रक्कम १० हजार रुपये हिसकावून नेले असल्याची कबुली दिली आहे. तसेच कार ९ ऑगस्ट रोजी रात्री सरदवाडी (ता. शिरूर) येथून साथीदाराच्या मदतीने चोरून आणली असल्याची कबुली दिली. खेड पोलिसांनी दीड लाख रुपये किमतीची कार जप्त केली आहे. या गुन्हातील दोन आरोपींचा शोध पोलीस घेत आहे. पुढील तपास सहायक फौजदार संदीप कारभळ करीत आहेत.
खेड पोलिसांनी जबरी चोरी करणाऱ्या आरोपीला केले जेरबंद, दीड लाखाचा मुद्देमाल हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 4:12 AM