पुणे : पुणे सातारा महामार्गावरील खेड शिवापूर आणि आणेवाडी टोल नाक्यावरून सोमवारी सायंकाळी ७ वाजल्यापासून पुढील २४ तास वाहने टोल फ्री सोडण्याचे आदेश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिले आहेत. त्यानुसार उद्या मंगळवारी १३ ऑगस्टला सायंकाळी सात वाजेपर्यंत २४ तासांसाठी या दोन्ही टोल नाक्यावरून वाहने फ्री सोडण्यात येणार आहेत. कोल्हापूर, सांगलीला आलेल्या महापुरानंतर गेल्या ७ दिवसांपासून हा महामार्ग बंद होता. त्यामुळे अनेक ठिकाणी हजारो वाहने अडकून पडली होती. सोमवारी महामार्ग सुरू झाल्यावर वाहने कोल्हापूरच्या दिशेने जाऊ लागली. या वाहनांकडून खेड शिवापूर आणि आणेवाडी टोलनाक्यावर टोल वसूल केला जात असल्याच्या तक्रारी वाहनचालकांनी केल्या. याबाबत सातारा जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे प्रकाश गवळी यांनी ‘लोकमत’कडे याबाबत तक्रार केल्यानंतर लोकमत ऑनलाइनवरून हे वृत्त सर्वप्रथम देण्यात आले होते. तसेच केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना ट्विट करून सांगितले होते. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने याबाबत टोल प्रशासनाला टोल फ्रीचे आदेश दिले. त्यानंतर सायंकाळी सात वाजल्यापासून खेड शिवापूर आणि आणेवाडी टोल नाक्यावरून सर्व वाहने टोल फ्री सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. ही टोल फ्रीची मुदत मंगळवारी सायंकाळी ७ वाजेपर्यंत राहणार आहे.
खेड शिवापूर, आणेवाडीचा टोल २४ तासांसाठी फ्री; ‘लोकमत’ च्या वृत्ताची दखल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 11:04 PM