लोकमत न्यूज नेटवर्क
भोर : टोलनाक्यावरील गर्दी टाळण्यासाठी फास्टॅग सुरू करण्यात आले. मात्र, असे असूनही फास्टॅगच्या नावाखाली टोल प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे खेड-शिवापूर टोलनाक्यावर रविवारी (दि.२८) दिवसभर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दुपारनंतर पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूककोंडी झाल्याने प्रवाशांना नाहक तासभर ताटकळत थांबावे लागले.
पुणे-सातारा महामार्गावरील खेड-शिवापूर टोलवरील चार लेन बंद ठेवल्याने तसेच फास्टॅगची अपुरी यंत्रणा यामुळे सातारा बाजूकडून येणाऱ्या वाहनांची संख्या एकदम टोलवर वाढत होती. यामुळे धिम्या गतीने वाहने पुढे जात होती. शनिवारी आणि रविवारी या दोन दिवसांच्या सुट्ट्या आल्याने पुणे-मुंबईमधील पर्यटक मोठ्या प्रमाणावर बाहेर पडले होते. रविवारी (दि.२८) परतीच्या मार्गावर वाहने जात असताना पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांची मोठ्या प्रमाणात कोंडी झाली. रविवारी सकाळपासूनच पुणे-सातारा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची मोठी गर्दी झाली होती. टोलनाक्यावरील भोंगळ कारभारामुळे या रांगा वाढतच गेल्या. त्यामुळे एकंदरीतच सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांना वाहतूककोंडीतच अडकून पडावे लागले. शासनाने मोठा गवगवा करून केंद्र शासनाच्या आदेशानंतर फास्टॅग यंत्रणाही या टोलनाक्यांवर लावण्यात आली आहे. मात्र, आवश्यक पायाभूत सुविधांचा अभाव आणि म्यूनलची कमतरता यामुळे प्रवाशांना व वाहनचालकांना याचा त्रास सहन करावा लागत होता. त्यातच फास्टॅगवरून होणारी वादावादी यामुळे टोलनाका पास करण्यास विलंब होत आहे.
सुट्ट्यामधील वाहतूककोंडीचा अनुभव असतानाही यासंदर्भात टोल प्रशासन ठोस नियोजन करण्यात अपयशी होत असल्याने अनेकवेळा प्रवाशांना नाहक त्रास आणि मनस्ताप सहन करावा लागत आहे.
कोट
टोलबंद करण्यासाठी गावांचा घेणार ठराव
टोल प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे रांगा लागत आहेत. मुळातच चुकीच्या ठिकाणी उभारलेल्या खेड-शिवापूर टोलनाका हा पीएमआरडीच्या हद्दीच्या बाहेर हलवावा, अशी टोलनाका हटाव संघर्ष कृती समिती मागणी आहे. टोलनाका तातडीने बंद करण्यासाठी भोर, वेल्हा आदी तालुक्यांतील ग्रामपंचायतींचे ठराव घेणार आहोत.
- ज्ञानेश्वर दारवटकर, संघर्ष समिती निमंत्रक