पुणे : खेड-शिवापूर टोलनाक्यावरील कोंंडी सोडविण्यासाठी टोल प्रशासनाला दिलेली मुदत बुधवारी संपत असून, जर तीन मिनिटांच्या आत वाहनांकडून टोल घेतला नाही, तर टोल खुला करा, असे आदेश टोल प्रशासनाला देणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.जिल्ह्यात सर्वाधिक वाहतूककोंडी होत असलेल्या मुंबई- बंगळुरू महामार्गावर खेड-शिवापूर हा टोलनाका आहे. येथे वाहनचालकांना नेहमीच अडकून बसावे लागते. महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार रिलायन्स कंपनी यांच्यातील करारनाम्यात तीन मिनिटांत टोल वसूल करून वाहने सोडली जातील. अधिक वेळ लागला, तर रस्ता खुला केला जाईल, अशी तरतूद आहे. यापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांनी या तरतुदीची अंमलबजावणी करा, अशा सूचना टोल प्रशासनाला दिल्या आहेत. सोमवारी राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीची बैैठक झाली.यात हा विषय चर्चिला गेला. या वेळी टोल प्रशासनाने जोपर्यंत सहापदरी रस्ता होत नाही, तोपर्यंत तीन मिनिटांत टोलवसुली होणे शक्य नाही. त्यामुळे तोपर्यंत मुदत द्या, अशी मागणी केली. यावर जिल्हा प्रशासनाने, टोलवसुली केली जाते, मग करारातील अटींप्रमाणे सेवा दिली पाहिजे, असे मत मांडले. यानंतर मुख्य सचिवांनी जिल्हाधिकाऱ्यांना, त्वरित उपाययोजना करा, अशा सूचना दिल्या आहेत. त्यानुसार ४८ तासांची मुदत दिली होती. ती मुदत उद्या २ डिसेंबरला संपत आहे. ३ मिनिटांत टोलनाक्यावरून वाहन पास होण्यासाठी काय उपाययोजना करीत आहोत, हे कळविण्यास सांगितले आहे. ते याची अंमलबजावणी कशी करणार आहेत ते बुधवारपर्यंत सांगणार आहेत. जर याबाबत काही कार्यवाही केली नाही, तर टोलवसुलीच्या प्रक्रियेत सुधारणांची पाहणी केली जाईल; अन्यथा सार्वजनिक उपद्रव कायदा कलम १३३ प्रमाणे टोलनाका खुला करण्याचे आदेश काढणार आहोत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.वाहतूककोंडी सोडविण्यासाठी हा एकमेव उपाय आहे. कार्यक्षमता वाढवा हीच आमची मागणी आहे. मोफत जाऊ देऊ नका; पण ३ मिनिटांच्या आत पैैसै घेतले पाहिजेत. या वेळेत पैसे घेतले नाहीत, तर वाहनचालकांनी पैसे न देता पुढे निघून जावे. लोकांना त्रास कमी होण्यासाठीच आम्ही कार्यवाही करणार आहोत.- सौरभ राव,जिल्हाधिकारी
खेड-शिवापूर टोलनाक्यावर खोळंबा झाला, तर जा फुकट
By admin | Published: December 02, 2015 4:13 AM