दावडी : मतदार नोंदणी अभियानामध्ये खेड तालुका राज्यात अव्वल असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांत मतदार मतदानापासून वंचित राहू नये, तालुक्यात ९० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान व्हावे, यासाठी तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा सक्षम करण्यात आली असून मतदार यादी अद्ययावत करून मतदाराना आवश्यक सेवासुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.निवडणूक प्रक्रिया सुलभ होण्यासाठी या वर्षापासून ‘निवडणूक मित्र’ संकल्पना राबविण्यात येणार आहे. निवडणुकीच्या वेळी या मित्रांचे मोठे योगदान लाभणार आहे. यामध्ये राजकीय व्यक्ती सोडून अनेकांना काम करण्याची संधी देण्यात येणार असून, मतदान केंद्र व मतदार यांना त्यांच्या माध्यमातून आवश्यक सेवासुविधा पुरविण्यात येणार आहेत. बूथ केंद्रावर पुरुषांच्या बरोबरीने महिलांना संधी देण्यात येणार आहे. ही यादी आतापर्यंत केवळ शिवसेनेच्या वतीने देण्यात आली असून, अद्याप इतर पक्षांनी जमा केलेली नसल्याचे प्रसाद यांनी सांगितले.. येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये मतदारांना आवश्यक अशा सुविधा, सेवा पुरविणे, मतदान केंद्रांवर सेवासुविधा उपलब्ध करून देणे, महिला मतदारसंख्या वाढविणे, मतदानाला प्रवृत्त करणे, त्यांच्या अडचणी सोडविणे, नोकरी, शिक्षण, लग्न आदी कारणास्तव राहत्या ठिकाणाहून बाहेरगावी गेलेल्या व तालुक्यात आलेल्या मतदारांची नोंदणी करून घेण्यात आली आहे. याबरोबरच मतदान केंद्रावर जाण्या-येण्यातील अडथळे दूर केले जाणार आहेत. सन १९९९-२००१ दरम्यान मतदार यादीची खात्री करून मिसिंग लिस्ट तपासण्यात येईल. बीएलओकडून ही कामे करून घेण्यात येत आहेत.ग्रामपातळीवर विविध समित्या तयार करून त्याद्वारे निवडणुकीचे कामकाज केले जाणार आहे. २०१५ ते २०१८मध्ये नव्याने मतदार झालेल्या मतदारांचे प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. खेड तालुक्यात शासकीय आकडेवारीनुसार ४२३ दिव्यांग व्यक्ती आहेत. त्यांना मतदानादरम्यान आवश्यक सेवा देण्यात येणार आहेत. १ जानेवारी १९४४च्या अगोदर जन्मलेल्या व्यक्तीची भेट घेण्यात येणार आहे. त्या हयात आहेत की नाही, याची खात्री करूनघेण्यात येईल.याबरोबरच त्या मतदानासाठी येण्यास आरोग्यदृष्ट्या ठीक आहेत का, हे पाहिले जाणार आहे. मार्च २०१९ ते जून १९ या काळात गर्भवती महिलांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वांच्या सर्वेक्षणातून त्यांना मतदान करण्याच्या दिवशी सर्व सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. त्यामुळे या वर्षी मतदानाची आकडेवारी वाढेल. गेल्या तीन महिन्यांत मतदार नोंदणी अभियानातून ९ हजार मतदारसंख्या वाढली आहे.
मतदार नोंदणी अभियानात खेड तालुका राज्यात एक नंबर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 12:49 AM