दावडी : खेड तालुक्याच्या पूर्व भागात यंदा म्हणावा असा पाऊस न पडल्याने विहिरी तुडुंब भरल्या नाहीत; तसेच वेळ नदीवरील धरण पूर्ण क्षमतेने न भरल्यामुळे नदीतूनही कमी क्षमतेने पाणी वाहत असल्याचे चित्र दिसत आहे.
पूर्व भागातील गोसासी, वाफगाव, वरुडे, वाकळवाडी, चिंचबाईवाडी, गाडकवाडी, चौधरवाडी, टाकळकरवाडी, कनेरसर या परिसरात यंदा म्हणावा असा पाऊस पडला नाही. पावसाची फक्त अधूनमधून रिमझिम होते. त्यामुळे पिकांना पुरेसा असा फायदा होत नाही. शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन व पाटावाटे पाणी देण्यास सुरुवात केली आहे. गुळाणी येथील तलाव पूर्ण क्षमतेने भरला नाही, तसेच वाफगाव येथील मातीचे धरण तुडुंब भरले नसून सांडव्यावरून पाणी पडताना दिसत नाही. या परिसरातील विहिरीही काठोकाठ भरल्या नाहीत. आॅगस्ट महिना संपत आला, तरी ओढे-नाले जोरात खळखळून वाहत नसल्याचे चित्र दिसत आहे. शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत असल्याचे चित्र आहे.