पुणे : आपल्या देशाला खेळाची मोठी परंपरा आहे. प्रत्येक भारतीयाने आपल्या पारंपरिक खेळांवर प्रेम केले तरच क्रीडा क्षेत्राला निश्चितच कलाटणी मिळेल, असा विश्वास व्यक्त करून ‘लिखोगे पढोगे तो होंगे नवाब; खेलोगे कुदोगे तो होंगे खराब’ असे न म्हणता ‘खेलोगे कुदोगे तो होंगे लाजवाब’ अशी म्हण रूढ झाली पाहिजे, अशी अपेक्षा केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी व्यक्त केली. देशात ज्या सरकारी क्रीडा संस्था उभ्या राहतील त्यांना देशातील खेळांडूचीच नावे देणार असल्याची घोषणाही त्यांनी या वेळी केली.
क्रीडा प्रशिक्षणाद्वारे सक्षमीकरण या उद्देशाने कार्यरत असलेल्या पुण्यातील इंडिया खेलेगा या क्रीडा संस्थेच्या स्पोर्टस् इन्किलाब प्रोजेक्टच्या दुसर्या टप्प्याचे उद्घाटन आज (दि. 17 जानेवारी 2021) केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते झाले त्या वेळी ते बोलत होते. प्रसिद्ध टेबल टेनिसपटू मनिका बत्रा हिने टाकलेला चेंडू रिजिजू यांनी उपस्थितांमध्ये टोलवून दुसर्या टप्प्याचे उद्घाटन अनोख्या पद्धतीने केले. इंडिया खेलेगा या संस्थेला गती मिळून ऑलिंपिक दर्जाचे खेळाडू या संस्थेतून निर्माण व्हावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
इंडिया खेलेगा ही क्रीडा प्रशिक्षण संस्था 2017 पासून स्पोर्टस् इन्किलाब प्रोजेक्ट हा वंचित बालकांना विनामूल्य टेबल टेनिस प्रशिक्षण देण्याचा उपक्रम राबवत आहे. खासदार गिरीश बापट, आमदार मुक्ता टिळक, शिक्षण प्रसारक मंडळीचे पदाधिकारी अॅड. एस. के. जैन, अशोक वझे, श्रीकृष्ण चितळे, अॅड. नंदकुमार फडके तसेच साईचे राजिंदर सिंग, कोव्हिड योद्धा डॉ. धनंजय केळकर, जतिन परांजपे, उमा कुणाल गोसावी, विशाल चोरडिया, सुंदर अय्यर, अभिजित कुंटे, नंदन बाळ आदी मान्यवर उपस्थित होते. श्रुती परांजपे, सन्मय परांजपे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
विविध खेळातील राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारप्राप्त खेळाडू, प्रशिक्षक आणि प्रोत्साहकांचा सत्कार रिजिजू यांच्या हस्ते करण्यात आला. सूत्रसंचालन डॉ. मंदार परांजपे यांनी केले.