शालेय पोषण आहार योजना निधी
पालकांच्या खात्यावर निधी वर्ग करण्यास
शासनाची मंजुरी
बारामती : शालेय पोषण आहार योजना उन्हाळी सुट्टीतील लाभ डीबीटीद्वारे देण्यासाठी विद्यार्थी खाती उघडण्याचा वादग्रस्त निर्णय अखेर सरकारने रद्द केला आहे. पालकांच्या खात्यावर या योजनेचा निधी वर्ग करण्यासाठी सुधारित शासन निर्णय घेण्यात आला आहे.
याबाबत शालेय शिक्षण विभागाने प्रसिद्ध केल्याची माहिती शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी दिली. त्यानुसार महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांची सोमवारी (१२ जुलै) भेट घेऊन विद्यार्थी खाती उघडण्यासाठी येणाऱ्या अडचणीबाबत सविस्तर चर्चा केली होती. या वेळी कोरोना संसर्गाचे गांभीर्य व राज्यातील पालक, विद्यार्थी यांची धावपळ लक्षात घेऊन आयुक्तांनी तातडीने शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी चर्चा करून पालकांची खाती ग्राह्य धरण्यासाठी निर्णय घेण्याचे आश्वासन शिक्षक संघाच्या शिष्टमंडळास दिले होते.हे आश्वासन पूर्ण झाले आहे.
मुंबई येथे शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड व शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांच्यातील तातडीच्या चर्चेनंतर शालेय पोषण आहार योजना डीबीटीद्वारे राबविण्यासाठी पालकांची उपलब्ध खाती ग्राह्य धरण्याचा शासन आदेश प्राथमिक शिक्षण संचालक यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा सरचिटणीस खंडेराव ढोबळे यांनी दिली.
राज्य शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांना निवेदन देताना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे पदाधिकारी.
१४०७२०२१-बारामती-१३