बावडा : बावडा येथील पोलीस दूरक्षेत्राला खेटूनच पाठीमागील बाजूस असलेल्या शासकीय गायरान जागेत एका व्यापाऱ्याने केलेले अतिक्रमण हटवण्यासाठी बावडा ग्रामपंचायतीस अतिक्रमण हटवण्यासाठी पोलीस बंदोबस्त देण्यास टाळाटाळ, कारणे देत असल्याचे ग्रामपंचायतीकडून सांगण्यात आले.
या चौकीच्या मागे भांडगाव रस्त्याकडेला शासकीय गायरानातील पाच गुंठे जागेत एका व्यापाऱ्याने अतिक्रमण करून सदरची पूर्ण जागा बळकावली आहे. त्याठिकाणी शेड उभारले आहे. सदरचे बांधकाम शेड हटविण्यासाठी पोलीस बंदोबस्त देण्यात यावा, यासाठी ग्रामपंचायतीने दोन वेळा इंदापूर पोलीस स्टेशनला लेखी पत्र देऊन फी भरण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र, पैसे भरून घेतले जात नाहीत व बंदोबस्तही दिला जात नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या अतिक्रमण हटाव मोहिमेस पोलिसांकडूनच खो बसला आहे.
याबाबतची माहिती अशी की, बावडा पोलीस चौकीच्या मागे पाच गुंठे शासकीय गायरान जमीन आहे. तेथे दोन-तीन महिन्यांपूर्वी एका व्यापाऱ्याने अपरात्री जेसीबी मशिनच्या साह्याने जागा साफ करून बळकावली याबाबत काही ग्रामस्थांनी व कार्यकर्त्यांनी इंदापूर तहसीलदार, तसेच गट विकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रारी दिल्या. त्यावर तहसील व पंचायत समितीने अधिकाऱ्यांमार्फत सदर जागेवर अतिक्रमण झाल्याची खात्री करून ते अतिक्रमण हटविण्याचे संबंधित जागा बावडा ग्रामपंचायतीने ताब्यात घेणे बाबत लेखी आदेश दिले. त्यानुसार ग्रामपंचायतीने संबंधित व्यापाºयास कायदेशीररित्या दोन नोटिसा बजावल्या त्या नोटिसांना न जुमानता त्याच जागेत मोठे शेड उभारून जागा बळकावली आहे. हे अतिक्रमण हटवण्यासाठी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी शासकीय फी भरून घेऊन पोलीस बंदोबस्त देण्याबाबत दोनवेळा लेखी पत्र दिले. मात्र, अद्याप ग्रामपंचायतीस पोलीस मदत देण्यात आलेली नसून तसेच पोलिसांनी पंचायतीस कसलाही पत्रव्यवहार करण्यात आलेला नाही. असे सरपंच किरण पाटील, उपसरपंच नीलेश घोगरे, ग्रामसेविका अंबिका पावसे यांनी सांगितले.
--
पोलीस खात्याविषयी नागरिकांत साशंकता?
पोलीस दूरक्षेत्राला खेटूनच असलेली ही शासकीय जागा मोक्याची व किमतीची असून ती राजरोसपणे बळकावली गेली असताना सदरचे अतिक्रमण हटवण्याची ग्रामपंचायतीची तयारी असताना पोलीस खात्याने टाळाटाळ केल्याने ग्रामस्थांमध्ये साशंकता व्यक्त होत आहे.
---
लवकरच बंदोबस्त देणार : लातुरे
बावडा ग्रामपंचायतीने अतिक्रमण हटवण्यासाठी पोलीस मदत मागितली आहे. मात्र, इतर व्यापामुळे ती मदत देता आली नाही. पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी आपणास बंदोबस्त देण्याबाबत सूचना दिलेली आहे. त्यामुळे लॉकडाऊन कालावधी संपल्यानंतर ग्रामपंचायतीस पोलीस मदत दिली जाईल, असे बावड्याचे सहायक पोलीस निरीक्षक बिरप्पा लातुरे यांनी सांगितले.
——————————————————
फोटो ओळी : बावडा (ता. इंदापूर) पोलीस चौकीलगत करण्यात आलेल्या अतिक्रमण.
२८०४२०२१-बारामती-१०
————————————————