लोकमत न्यूज नेटवर्क
खोर : खोर (ता. दौंड) येथे सुरू असलेल्या वाळूउपसावर महसूल विभागाच्या पथकाने छापा टाकला आहे. या प्रकरणी बेकायदेशीररीत्या सुरू असलेल्या वाळूउपसा करणारे जेसीबी, ट्रॅक्टर महसूल विभागाने ताब्यात घेतले असून तब्बल २५ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.
रविवार दि. ४ रोजी दुपारी १:३० च्या सुमारास खोर येथील पाटलाची वाडीच्या हद्दीत विनापरवाना, बेकायदेशीर व चोरटी वाळूउपसा करीत असल्याचे गावकामगार तलाठी बापू देवकाते यांच्या निदर्शनास आले. या वेळी गावकामगार तलाठी बापू देवकाते यांनी यवत पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे, दशरथ बनसोडे, संपत खबाले यांच्या पथकाने ही संयुक्तरीत्या कारवाई केली आहे.
खोर परिसरातील पाटलाचीवाडी हद्दीत ओढ्याच्या कडेला मारुती केशव चौधरी (रा. खोर, ता. दौंड) यांच्या मालकीच्या शेतजमिनीत जेसीबी व ट्रॅक्टर यांच्या साह्याने वाळूउपसा चालू होता. ज्या वेळी या पथकाने छापा टाकला असता जेसीबीचालक मोहन गेमू राठोड (वय ३२, सध्या रा. खिंडीचीवाडी, मूळ राहणार तिरतांडा, ता. गुलबर्गा) तर ट्रॅक्टरचालक सुधीर चंद्रकांत चौधरी (वय ४०, रा. हरिबाचीवाडी, खोर) यांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी वाळूउपसा करणारे मालक रुपेश दिलीप चौधरी (रा. पाटलाचीवाडी, खोर) याने आम्ही नेहमीच वाळूउपसा करीत असतो, असे महसूल विभागाच्या पथकाला सांगितले. या वेळी १५ लाख रुपये किमतीचा जेसीबी, १० लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर महसूल विभागाने ताब्यात घेतला आहे. तब्बल २५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करून वाळूउपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी बेकायदेशीररीत्या वाळूउपसा सुरू होता. त्या शेतजमिनीवर बोजादेखील चढविण्यात येणार असल्याचे महसूल विभागाने सांगितले आहे. पुढील तपास यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील व सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे करीत आहेत.
फोटोओळ : खोर (ता. दौंड) येथे सुरू असलेल्या वाळूउपसावर महसूल विभागाच्या पथकाने छापा टाकला आहे. या प्रकरणी बेकायदेशीररीत्या सुरू असलेल्या वाळूउपसा करणारे जेसीबी, ट्रॅक्टर महसूल विभागाने ताब्यात घेतले असून, तब्बल २५ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.