दारूल उलूम हिलालिया गरीब नवाज येथे संस्थेचे अध्यक्ष मुबारक भाई तांबोळी व हाजी गुलामनबी शेख यांच्या पुढाकाराने हे आयसोलेशन सेंटर सुरू करण्यात आले आहे. यामुळे राजुरी गावातील सर्व नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कमी लक्षण असलेले किंवा लक्षण नसलेले रुग्ण हे घरीच विलगीकरणात राहून उपचार घेत असल्याने कोरोनाचा फैलाव अधिक होण्याची शक्यता गृहीत धरून ख्वाजा गरीब नवाज आयसोलेशन सेंटर तातडीने सुरू केले आहे.
आयसोलेशन सेंटरसाठी राजुरी येथील डॉ. संदीप काकडे व डॉ. शिंदे, डॉ. स्वप्निल कोटकर हे रुग्णांवर उपचार करणार आहेत. या आयसोलेशन सेंटरसाठी आमदार अतुल बेनके यांच्या प्रयत्नांतून २५ बेड व इतर साहित्याची मदत जुन्नर तालुका मित्रमंडळ, पुणे यांच्या वतीने करण्यात आली.
संकल्प बहुउद्देशीय युवा संस्थेचे मुख्य प्रवर्तक हाजी गुलामनबी शेख यांच्या विशेष प्रयत्नातून व सर्व पदाधिकारी यांनी पुढाकार घेऊन तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याकडील परवानगी प्राप्त झाली आहे. तसेच लोकवर्गणीतून सुमारे ७० हजार रुपये किमतीची औषधे आयसोलेशन सेंटरला मदत म्हणून दिली. संकल्प अन्नपूर्णा केंद्राच्या वतीने रुग्णांना दोन वेळचे जेवण देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. या वेळी आमदार अतुल बेनके, मुसलमान जमाअत राजुरीचे अध्यक्ष जाकिर पटेल, दारूल उलूम हिलालिया गरीब नवाजचे विश्वस्त व पदाधिकारी, जुन्नर तालुका मित्र मंडळ, संकल्प बहुउद्देशीय युवा संस्थेचे मुख्य प्रवर्तक हाजी गुलामनबी शेख, दीपक औटी, सरपंच प्रिया हाडवळे, उपसरपंच माऊली शेळके, एम. डी. घंगाळे, मुबारक तांबोळी, शाकिर चौगुले, संकल्पचे अध्यक्ष कलिम पटेल, सदर जाकिर पटेल, प्राध्यापक मेहबूब काजी, सादिक अतार आदी मान्यवर उपस्थित होते.
राजुरी (ता.जुन्नर) येथील आयसोलेशन उद्घाटनप्रसंगी आमदार अतुल बेनके व मान्यवर.