चाकण: औद्योगिक क्षेत्रातील श्रीक्षेत्र म्हाळुंगे इंगळे (ता. खेड) गावात गरबा खेळत असताना कॉलर धरून बाहेर काढल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून तीन जणांनी एकावर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या घटनेत दोन जण जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी (दि. १२) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
सूरज गणपत कदम (वय ३०, रा. महाळुंगे इंगळे, ता. खेड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सौरभ मुळे (वय २७, रा. महाळुंगे) यांच्यासह दोन अनोळखी मित्रांवर महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन गिते यांनी दिली. महाळुंगे इंगळे गावात छावा प्रतिष्ठान मित्रमंडळाने नवरात्रोत्सव आणि विजयादशमीच्या निमित्ताने गरबा दांडियाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी सौरभ याने शंकर नवगणेच्या मुलाला कॉलर धरून दांडियातून बाहेर काढल्याच्या कारणावरून शंकर नवगणे व सौरभ मुळे यांच्यात भांडण झाले. त्यानंतर महिलांमध्ये वाद निर्माण झाल्याने दांडियाचा कार्यक्रम बंद करण्यात आला; परंतु कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या महिलांनी सौरभ यास आमच्यावर दादागिरी का करतो, असे म्हणून मारहाण केली. यावेळी सौरभ याच्या सोबत असलेल्या दोन अनोळखी व्यक्तींपैकी एकाने आपल्या जवळील पिस्तूलमधून गोळी झाडून नीलेश आसाटी (वय ३८, रा. महाळुंगे) यास जिवे मारण्याच्या उद्देशाने गोळीबार करून गंभीर जखमी केले, तर दुसऱ्याने सूरजच्या डोक्यात वीट मारून जखमी केले. हातातील पिस्तुलातून हवेत गोळीबार करून परिसरात दहशत निर्माण करून तिन्ही आरोपी फरार झाले. पुढील तपास महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन गिते करीत आहेत.