पुणे : खासगी चारचाकी वाहन चालून उदनिर्वाह चालवणाऱ्या इसमाचे पैशासाठी अपहरण करण्यात आले. पोलिसांकडे तक्रार दाखल होतात, तपासाची चक्रे फिरली आणि सहा जणांच्या टोळीला पकडण्यात खंडणी विरोधी पथक १ च्या युनिट २ आणि उत्तमनगर पोलिसांना यश आले. याप्रकरणी उत्तमनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूनम वैभव जाधव (२६) यांनी ५ ऑगस्ट रोजी पोलिसांना तक्रार अर्ज दिला होता. यामध्ये त्यांचा पती वैभव श्रीकृष्ण जाधव (२७) यांचे जून्या पैशांच्या वादातून अक्षय मोहन पाटील (२८) याने ४ ऑगस्ट रोजी रात्री ८ च्या सुमारास त्याच्या अन्य साथीदारांसोबत अपहरण केल्याचे म्हटले होते. या प्रकरणातील फिर्यादी आणि आरोपी यांचे मूळगाव सांगली जिल्याह्यातील असल्याने पोलिसांनी प्रथम सांगलीकडे तपासाची चक्रे फिरवली.
तपासादरम्यान पोलिसांना आरोपींचा ठावठिकाणा माहिती पडला, पोलिसांनी धाड टाकत आरोपी अक्षय मोहन कदम (२८), सुशांत मधुकर नलावडे (२६), महेश मलिक नलावडे (२५), बोक्या उर्फ रंजीत दिनकर भोसले (२६), प्रदीप किसन चव्हाण (२६) आणि अमोल उत्तम मोरे (३२) यांना सांगली जिल्ह्यातील तासगाव येथून गावाबाहेर असलेल्या एका बंद पत्र्याच्या खोलीतून ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या आरोपींची चौकशी केली असता त्यांनी अपहरण केल्याचे मान्य केले. यावेळी त्यांच्या ताब्यातून अपहरण झालेले वैभव कदम यांची सुटका देखील करण्यात आली.
ही कामगिरी गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त गुन्हे १ चे सुनील तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक १, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अजय वाघमारे, किरण बालवडकर, नंदकुमार बिडवई, सहायक पोलिस निरीक्षक अभिजीत पाटील, पोलिस अंमलदार रवींद्र फुलपगारे, किरण देशमुख, किरण ठवरे, उज्ज्वल मोकाशी, राजेंद्र लांडगे आणि ज्ञानेश्वर तोडकर यांच्या पथकाने केली.