पुणे : ससून रुग्णालयाशेजारील फुटपाथवर झोपलेल्या कुटुंबातील सव्वा वर्षाच्या लहान बाळाचे अपहरण करणा-यांचा ६ दिवसांनी छडा लावण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. भीक मागण्यासाठी त्यांनी या बाळाला पळवून नेले होते.चंदा मनोज ऊर्फ लखन चव्हाण (वय २५) आणि मनोज ऊर्फ लखन चव्हाण (वय २५, रा़ पुणे फिरस्ता) अशी त्यांची नावे आहेत. याप्रकरणी नरेंदर बागडी यांनी फिर्याद दिली होती. ते मुळचे राजस्थानमधील असून काही महिन्यांपासून पुण्यात मोलमजुरी करुन ससून रुग्णालया शेजारील फुटपाथवर झोपतात. या घटनेच्या दोन दिवस अगोदर त्यांची पत्नी मनिषा आणि सव्वा वर्षाच्या मुलगा नसीब हे पुण्यात आले होते़. ९ जानेवारीला ते फुटपाथवर झोपले असताना पहाटे ३ ते ४ वाजण्याच्या दरम्यान नसीबला या दोघांनी पळवून नेले होते. बागडी हे गरीब असले तरी अपहरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त समीर शेख यांनी शोधासाठी टीम तयार केल्या. खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव त्यांच्या सहका-यांनी मिळालेले सीसीटीव्ही फुटेज तपासून सर्वत्र शोध घेण्यास सुरुवात केली. बातमीदाराकडून हवालदार प्रमोद मगर यांना हे बाळ कर्जत येथे असल्याची माहिती मिळाली़ खंडणी विरोधी पथकाचे पथक तातडीने तेथे गेले. तेथील एसटी़ बसस्थानकाजवळ चंदा व मनोज चव्हाण हे दोघे जण या बाळाला घेऊन भीक मागत असल्याचे आढळून आले़ या बाळाचे अपहरण केल्यानंतर ते दोघे उरळी कांचन येथे गेले. त्यानंतर ते परत पुण्यात आले़ पुण्यातून एक दिवस पिंपरीत राहून ते लोणावळ्याला गेले़ तेथून ते कर्जतला जाऊन भीक मागत होते. ही कामगिरी सहायक पोलीस निरीक्षक समीर शेख, खंडणी विरोधी पथकाचे निरीक्षक रघुनाथ जाधव, सहायक पोलीस निरीक्षक सुनिल गवळी, विठ्ठल शेलार, कर्मचारी प्रमोद मगर, मंगेश पवार, धीरज भोर, अविनाश मराठे, रमेश गरुड, शिवाजी घुले, संतोष मते, भाऊसाहेब कोंढरे, फिरोज बागवान, रणजित अभंगे, एकनाथ कंधारे, प्रदीप शिंदे, नारायण बनकर, शिवरंग बोले, सुधीर इंगळे, हनुमंत गायकवाड यांनी केली.
आणि बाळ आईकडे झेपावले...कर्जत येथे बाळ असल्याची माहिती मिळाल्यावर खंडणी विरोधी पथकाने या बाळाची आई मनिषा हिला आपल्याबरोबर नेले होते. कर्जत एस टी बसस्थानकाजवळ ते जाताच तिने पोलिसांच्या हातातील बाळाला पाहिले़ आणि ती त्याच्याकडे जाऊ लागली़ बाळाने आपल्या आईला पहाताच पोलिसांच्या हातून ते आईकडे झेपावले़ बाळ कुशीत येताच मनिषाच्या डोळ्यातून अश्रु वाहू लागले़ तिने तेथेच त्याला आपल्या पदराखाली घेऊन दुध पाजले़ त्यानंतर ती पोलिसांच्या पाया पडायला लागली़ हे दृश्य पाहून जमलेले एस टी कामगारही हेलावून गेले. आपले बाळ तुमच्यामुळे मिळाले. आता आम्ही पुण्यात राहणार नाही़ पुन्हा गावाला परत जाऊ़ हा माझा पहिलाच मुलगा आहे. त्याला खुप शिकविणार असल्याचे मनिषा हिने सांगितले.