पुणे : पुणे रेल्वे स्टेशनमधून अपहरण झालेली पाच वर्षांची मुलगी दहा दिवसानंतर शुक्रवारी सकाळी रेल्वे स्टेशन परिसरातच सापडली. अपहरणकर्त्या महिलेनेच तिला आणून सोडल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. लोहमार्ग पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असून त्यात महिला पोलिसांना दिसून आली आहे. जयश्री जयसिंग चव्हाण असे अपहरण झालेल्या मुलीचे आहे. तिचे २१ मेला एका अनोळखी महिलेने अपहरण केले होते. याप्रकरणी जयसिंग चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयश्री ही मुळची नागपूर येथील कोनवली बारा येथील राहणारी आहे. तिचे आई वडील जयश्रीसह कामाच्या शोधात पुण्यात आले होते. रेल्वे स्टेशन समोरील दर्ग्यासमोर त्यांची दोन्ही मुले खेळत होती. काही काळानंतर जयश्री तेथे नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे तिच्या आई-वडिलांनी तिचा रेल्वे स्टेशन परिसर, एसटी स्थानक परिसर, ससून परिसरात शोध घेतला. परंतु, ती कोठेच सापडली नसल्याने पोलिसांमध्ये तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुध्द अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सीसीटिव्ही फुटेज तपासले आहे. तसेच पोलिसांकडूनही मुलीचा शोध घेतला जात होता. पोलिसांनी जयश्रीचे फोटोही सर्वत्र प्रसारित केले होते. तसेच लोहमार्ग पोलिसांची वेगवेळी पथके तिचा शोध घेत होते. दरम्यान शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास जयश्री पोलिसांना पुणे रेल्वे स्टेशनवर आढळली. त्यानंतर तिला आईवडीलांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलिसांनी तिच्याकडे विचारणा केली असून तिला एका महिलेने नेले असल्याचे तिने सांगितले. तसेच तिने तिला नीट जेवणही दिले असल्याची माहिती दिल्याचे लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोज खंडाळे यांनी सांगितले.
अपहरण झालेली मुलगी पुन्हा पुणे स्टेशनवरच सापडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2018 3:37 PM
मुळची नागपूरमधील कोनवली बारा येथे राहणाऱ्या जयश्रीचे दहा दिवसांपूर्वी पुणे रेल्वे स्टेशन येथून एका महिलेने अपहरण केले होते.
ठळक मुद्देलोहमार्ग पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुध्द अपहरणाचा गुन्हा दाखल