- किरण शिंदे
पुणे : दोन सख्या अल्पवयीन बहिणींचे अपहरण करून त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करून फरार झालेल्या एका आरोपीला वारजे माळवाडी पोलिसांनी तब्बल ९ वर्षांनी बेडा ठोकल्या. माऊली सखाराम राजिवाडे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 2015 साली वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, ५ एप्रिल २०१५ रोजी दोन ते तीन जणांनी दोघा अल्पवयीन बहिणींना लग्नाचे आमिष दाखवून पळून गेले होते. त्यांना सोलापूर शहरात घेऊन जाऊन आरोपी धनंजय सखाराम राजीवडे माऊली सखाराम राजीवडे आणि दोन विधीसंघर्षित बालकांनी त्यांच्यावर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला होता. वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात कलम ३६३, ३६६, ३७६(अ), ३७७, ३५४(अ), ३२३, ५०४, ५०६(१), ३४ सह बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्यातील आरोपी धनंजय सखाराम राजीवडे याला पोलिसांनी तेव्हाच अटक केली होती. त्याचा भाऊ माऊली सखाराम राजीवडे हा २०१५ पासून फरार होता. वारजे माळवाडी पोलीस ठाण्याचे कर्मचारी त्याचा शोध घेत होते. मात्र तो सापडत नव्हता. फरार आरोपीचा कोणताही फोटो पोलिसांकडे नसल्याने त्याचा सुगावा लागत नव्हता. दरम्यान मागील काही दिवसांपासून वारजे माळवाडी ठाण्यातील कर्मचारी या गुन्ह्याचा तपास करत होते. पोलीस शिपाई राहुल हंडाळ आणि पोलीस शिपाई गुजर हे या गुन्ह्याचा तांत्रिक तपास करत असताना आरोपी माऊली हा कोंडवे धावडे येथे राहत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांनी वरिष्ठांना याची माहिती कळवली आणि सापळा रचून आरोपी माऊली राजीवडे याला तब्बल ९ वर्षांनी अटक करण्यात आली.
ही कारवाई पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त भीमराव टिळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज शेडगे, पोलीस निरीक्षक निळकंठ जगताप, उपनिरीक्षक रामेश्वर पारवे, पोलीस कर्मचारी सुशांत फरांदे, ज्ञानेश्वर गुजर, रवी गाडे यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी केली.