पुणे : अपहरण करून ताम्हिणी घाटात घेऊन जात गोळ्या झाडून खून केल्याप्रकरणी आरोप असलेला तृतीयपंथीय दीपा राजमाने यांना जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील वेदपाठक यांनी जामीन मंजूर केला.
वारजे भागातून पूजा करण्याच्या बहाण्याने गजानन हवा याचे १८ मे रोजी सायंकाळी अपहरण केले. तसेच ताम्हिणी घाटामध्ये नेऊन गोळ्या झाडून त्याची हत्या केल्याचा गुन्हा उघड झाला हाेता. पोलिसांनी गाडीतील रक्ताच्या डागावरून खुनाचा छडा लावला.
प्रथम सौरभ आमले आणि सोमेश चव्हाण यांना अटक केली. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत तृतीयपंथी दीपाचे नाव समोर आले. त्याने दोघांकडून खून करण्यासाठी २० लाख रुपयांची सुपारी घेतल्याचा आरोप होता. दीपा याने ॲड. सचिन झालटे-पाटील, ॲड. अजिंक्य मिरगळ, ॲड. प्रणाली मुळे यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. गुन्ह्यात सहभाग असल्याचा प्रथमदर्शनी पुरावा नसल्याने जामीन देण्यात आला आहे.