पुणे : अल्पवयीन मुलीचे अपहरण व बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कर्नाटकातील २२ वर्षीय आरोपीला विशेष न्यायाधीश एस. पी. पोंक्षे यांनी १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर व अटीवर जामीन मंजूर केला.
पीडित मुलगी यात्रेसाठी आई-वडिलांबरोबर कर्नाटकमधील काकाच्या घरी गेली होती. तिथे तिची तरुणाशी ओळख झाली. त्यांनी एकमेकांना मोबाइल नंबर दिले. तरुणाने पीडित मुलीला निगडी येथे एके ठिकाणी भेटायला बोलावले. पीडितेला लग्नाची मागणी घालून तो कर्नाटकमध्ये घेऊन गेला. त्याने तिची संमती नसताना तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. मुलगी घरात नसल्यामुळे आईने चिखली पोलिस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज दिला. तपासात पोलिसांनी कर्नाटक येथून आरोपीला अटक केली.
आरोपीवर चिखली पोलिस स्टेशनअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. पीडित मुलगी स्वत:च्या इच्छेने आरोपीसोबत गेली व कृत्यास संमती दिली, असा युक्तिवाद बचाव पक्षाचे वकील ॲड. तौसिफ शेख, ॲड. इम्रान शेख, ॲड. आतिफ तांबोळी यांनी केला. तो युक्तिवाद मान्य करून न्यायालयाने आरोपीला जामीन मंजूर केला.