पुणे : नांदेड येथील सराफ व्यावसायिकाच्या नोकराला पुण्यात लुटणाऱ्या ॲन्टीकरप्शन पोलिसांच्या तोतया टोळीला स्वारगेट पोलिसांनी जेरबंद केले. आरोपींचा आठ दिवस-रात्र पाठलाग केल्यानंतर मध्य प्रदेश व उत्तर प्रदेशातून पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून २५ लाख रुपये, दोन गावठी पिस्तूल, कार असा ३३ लाख ८ हजाराचा माल जप्त केला आहे.
शरीफ मोहम्मद सरवर शेख (वय ५४, रा. नांदेड), विपीन द्वारकादास तिवारी (वय ३५, रा. इंदूर, मध्य प्रदेश), कपिल वीरसिंग यादव (वय २९, रा. झाशी, उत्तर प्रदेश), भूपेंद्र शामलाल राय (वय ३०, रा. बिना, मध्य प्रदेश), शैलेंद्रकुमार रामसेवक राय (वय ३१, रा. उरई, उत्तर प्रदेश), अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलीस उपायुक्त सागर पाटील, सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण यांनी माहिती दिली. नांदेडहून पुण्यात सोने खरेदीसाठी आलेल्या सराफ व्यावसायिकाच्या नोकरांना ॲन्टीकरप्शनचे पोलीस असल्याचे सांगून २७ लाख ५८ हजार रुपयांची रोकड लुटली होती.
असा झाला तपास-
स्वारगेट पोलिसांनी नांदेडपासून पुण्यापर्यंतचे अनेक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. कॅमेऱ्यात एक कार संशयास्पद असल्याची आढळून आली. परंतु, तिचा नंबर चुकीचा होता. त्यानंतर नांदेड येथील शर्मा ट्रॅव्हल्सच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या पाहणीत शरीफ शेख घुटमळताना दिसला. त्याला बीडमधून पोलिसांनी ताब्यात घेतले. शरीफ मोहम्मद याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर, पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांच्या सूचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, उपनिरीक्षक अशोक येवले, कर्मचारी सोमनाथ कांबळे, संदीप साळवे, सचिन दळवी, शैलेश वाबळे, ज्ञाना बडे व मनोज भोकरे यांच्या पथकाने आठ दिवसात मध्य प्रदेशातील इंदूर, झाशी व उत्तर प्रदेशातील विविध भागातून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत रेकी करून सराफ व्यावसायिकाच्या नोकराला लुटल्याची त्यांनी कबुली दिली.