पुणे: हॉटेलमध्ये जेवण बनवून झाल्यावर दुचाकीवरून घरी निघालेल्या कुकचे अपहरण करून त्याच्या हॉटेल मालकाकडे १० हजार रूपयांची खंडणी मागण्यात आली. ही घटना खराडी पायपास परिसरात शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी गुन्हेगारांचा शोध घेऊन तिघांना अटक केली.
मुकेश मनोज जाधव (२१ ,रा.नागपाल रोड), मनोहर काशिराम जाधव( २३ रा.शिरुर), विनोद चव्हाण(चंदननगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. विश्वजीत पाल असे अपहरण झालेल्या कुकचे नाव आहे. याप्रकरणी गगन अशोक तलवार ( २१ ,रा.खराडी) यांनी चंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, फिर्यादी तलवार यांच्याकडे कुक विश्वजीत पाल काम करतो. तो जेवण बनवून झाल्यावर घरी दुचाकीवर चालला होता. यावेळी आरोपींनी त्याला खराडी बायपास जवळ मारहाण करुन टमटम रिक्षामध्ये टाकले. पाल याला वाटले धक्का लागल्यामुळे मारहाण केली असेल. मात्र रिक्षाचे पडदे लावून त्याला चंदननगर येथील जंगल परिसरात नेले. तेथे पुन्हा मारहाण करुन पैशाची मागणी करण्यात आली. त्याने पैसे नसल्याचे सांगितल्यावर मालकाकडून पैशाची मागणी करण्यास सांगितले. त्याने मालकाकडे फोन करुन पैसे मागितले, मात्र पैसे पाठविण्यासाठी ते स्वत:चा गुगल पे नंबर देत नव्हते. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा मालकाला फोन करुन आम्ही तुझ्या जीवाचे बरे वाईट करणार आहोत असे सांगायला लावले. मालकाला सुरूवातीला हा प्रकार खोटा वाटल्यामुळे त्यांनी रस्त्याने जाऊन पाहिले. त्यावेळी पाल याची दुचाकी पडल्याचे दिसले. तेथील नागरिकांपाशी चौकशी केली असता, त्यांनी तिघांनी एका व्यक्तीला रिक्षात घालून नेल्याचे सांगितले. त्यानंतर मालकाने पोलिसात धाव घेतली.
पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे मालकाने फोनवर आरोपींसोबत संवाद सुरू ठेवला. यानंतर पोलिसांनी जंगल परिसराकडे धाव घेतली असता, तेथे आरोपी कुकला मारहाण करुन डांबून ठेवल्याचे दिसले. यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. तिघांपैकी दोघे मूळचे कर्नाटक येथील आहेत. तर अन्य एक बीडी कामगार वसाहत येथील रहिवाशी आहे. ही कामगिरी सहायक पोलिस निरीक्षक गजानन जाधव, कर्मचारी महेश नानेकर, अमित कांबळे यांच्या पथकाने केली.-------------------