लोकमत न्यूज नेटवर्कभिगवण : येथे एका लॉजवर विश्रांतीसाठी थांबलेल्या हैदराबाद येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचे अज्ञातांनी अपहरण केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. त्यामुळे एकच खळबळ माजली. तेलंगणा सरकारने गरिबांना देण्यासाठी बकरी खरेदी योजना राबवली. यातील कमिशनच्या व्यवहारातून अधिकाऱ्याचे अपहरण झाल्याची शक्यता स्थानिक व्यापाऱ्यांनी बोलताना व्यक्त केली. ही घटना लॉजमधील सीसीटीव्हीत कैद झाली असून उशिरापर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल झाला नव्हता. पोलिसांनी या अधिकाऱ्याच्या शोधार्थ पथक पाठविले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. भिगवण येथे एका पशुवैद्यकीय अधिकाऱ्याला अज्ञातांनी शुक्रवारी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास जबरदस्तीने बोलेरो गाडीत बसवून त्याचे अपहरण केले. अपहरणकर्त्यांनी जबरदस्तीने अधिकाऱ्याला गाडीत घालून पळवून नेले. तेलंगणा सरकारने अनुदानापोटी मेंढ्यावाटप सुरू केले आहे. त्यासाठी हे वैद्यकीय अधिकारी ३ तारखेपासून भिगवण परिसरातील शेतकऱ्यांच्या मेंढ्या खरेदी करून तेलंगणाला पाठवित होते. त्यातीलच काही आर्थिक व्यवहारामुळे या अधिकाऱ्याचे अपहरण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता.
तेलंगणाच्या वैद्यकीय अधिकाऱ्याचे अपहरण
By admin | Published: July 08, 2017 2:10 AM