पुणे : बारा दिवसांपूर्वी दोन वर्षीय बाळाचे पुणे स्टेशनवरून अपहरण झाल्याची घटना उघडकीस आली होती. तेव्हापासून लोहमार्ग पोलीस या अपहरणकर्त्यांच्या शोधात होते. १२ दिवसांनंतर २२ डिसेंबर गुरुवार रोजी रांजणगाव येथून लोहमार्ग पोलिसांनी अपहरणकर्त्यांना ताब्यात घेतले, व दोन वर्षीय बालकाला त्याच्या आई-वडिलांच्या स्वाधीन केले. वयाच्या ४० वर्षांपर्यंत या आरोपी दांपत्याला मूल होत नसल्याने त्यांनी या बाळाचे अपहरण केल्याचे लोहमार्ग पोलिसांना सांगितले.
पुण्यात उदरनिर्वाहासाठी आलेले एक दांपत्य त्यांच्या मूळगावी झारखंड येथे जाण्यासाठी पुणे रेल्वे स्टेशनवर आले होते. या दांपत्याबरोबर त्यांचा अडीच वर्षाचा चिमुरडाही होता. प्लॅटफॉर्म क्रमांक १ जवळील सरकत्या जिन्याजवळ रात्री साडेआठच्या सुमारास एक महिला व एक पुरूष त्यांच्याजवळ आले. त्यांच्याशी गप्पा मारत असताना, संबंधित आरोपी महिलेने तिच्याजवळील खाऊ मुलाला खाण्यास दिला. दरम्यान मुलाबद्दल आपल्याला जिव्हाळा आहे, असे दाखवून ते दोघेही त्या बाळाला आणखी खाऊ आणतो म्हणून घेऊन गेले आणि पुन्हा परतलेच नाहीत. घडलेल्या प्रकाराची माहिती रेल्वे पोलिसांना मिळानंतर लोहमार्ग पोलिसांच्या पथकाने तपास सुरू केला. दरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही, रिक्षा चालक, हॉटेल तपासत विविध भागात नाकाबंदी देखील केली. पण बाळाच्या आई-वडिलांनी पोलिसांकडे येऊन तक्रार देण्यास वेळ घातल्याने अपहरणकर्त्यांना पळून जाण्यासाठी वेळ मिळाला. मात्र यानंतरही लोहमार्ग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद खोपीकर यांनी हताश न होता, बाळाचा शोध सुरूच ठेवला. भूपेश भुवन पटेल (वय २ वर्ष ११ महिने) असे अपहरण झालेल्या बाळाचे नाव आहे.
तब्बल १२ दिवसांनंतर तांत्रिक तपासाआधारे भूपेश आणि दोन इसम (एक महिला व एक पुरूष) हे रांजणगाव परिसरात असल्याची माहिती त्यांना मिळाली, यानंतर खातरजमा करत लोहमार्ग पोलिसांनी रांजणगाव परिसरातून आरोपींच्या मुसक्या आवळल्या. या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विजय अनंत जयस्वाल आणि सुमन शर्मा अशी (वय दोघेही ४०) या पती-पत्नी आरोपींची नावे आहेत. दोन वर्षापुर्वी त्यांनी लग्न केले होते. त्यांना मूल होत नसल्याने या दोघांनी पुणे रेल्वे स्टेशन येथून या मुलाचे अपहरण केले. ही कारवाई पुणे लोहमार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रमोद खोपीकर, ईरफान शेख, सहायक पोलिस निरीक्षक पालवी काळे, आंतरकर यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांच्या सहभागाने केली.