पुणे : सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी करीत, घरात घुसून एकाचे अपहरण करून ‘दीड लाख रुपये द्या, नाहीतर खोटे गुन्हे दाखल करू,’ असे सांगत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी आणखी तिघांना अटक केली. न्यायालयाने त्यांना २४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
शमीम शेख (वय ३०), पल्लवी गायकवाड (वय ३०), फ़ैयाज शेख (वय ३०) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी यापूर्वी एका महिलेला अटक करण्यात आली आहे. याबाबत ६३ वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. १२ ऑगस्ट रोजी सकाळी साडेसहा ते दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली.
आरोपींनी फिर्यादी यांच्या घरात जबरदस्तीने घुसून सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी केली. त्यानंतर घरातील लॅपटॉप, मोबाईल, सोसायटीची कागदपत्रे, पाण्याच्या मोटारीचे स्टार्टर व बँकेची पासबुक जबरदस्तीने घेतली. त्यानंतर फिर्यादींना जबरदस्तीने कारमध्ये बसवून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून दीड लाख रुपये द्या, नाहीतर खोटे गुन्हे दाखल करून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर फिर्यादींना खेड शिवापूर येथे सोडून दिले, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी तिघांना न्यायालयात हजर केले असता, गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यासाठी, त्यांनी अशा प्रकारे आणखी गुन्हे केले आहेत का?, त्यांचा आणखी कोणी साथीदार आहे का? याचा तपास करण्यासाठी त्यांना पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील अंजला नवागिरे यांनी केली.
....