वारजे : एका सोळा वर्षीय युवकाचा अपहरण करून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अद्याप दोन आरोपींना अटक केली आहे. विठ्ठलनगर येथे राहणाऱ्या निखिल अनंत आग्रोळकर असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. खून केल्यानंतर आरोपींनी मृतदेह रस्त्याच्या कडेला पुरून ठेवला होता.
या प्रकरणी विनयसिंह वीरेंद्रसिंह राजपूत (वय २३, रा. हिंगणे बिल्डिंग, विठ्ठलनगर, वारजे) व हृषीकेश मारुती पोळ (वय १९ रा. वारजे माळवाडी) असे अटकेत असलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विनयसिंह हा वारजे परिसरातील एका जीममध्ये कामाला असून जवळच राहत असल्याने त्याचे अंग्रोळकर कुटुंबियाकडे येणे जाणे होते. रविवारी (दि. १३) मयत निखिल हा घरी परत न आल्याने त्याच्या वडिलांनी वारजे पोलिसांत तो हरवल्याची तक्रार दिली होती. पोलिसांनी केलेल्या तपासात निखिल हा शेवटी विनयसिंहबरोबर दुचाकीवर कुठेतरी गेला असल्याची माहिती मिळाली होती. दोन दिवस विचारणा केल्यावर बुधवारी रात्री उशिरा राजपूतने गुन्ह्याची कबुली दिली.
त्याच्या सांगण्यानुसार रविवारी संध्याकाळी आरोपीने निखिलला दुचाकीवर बसून बोलायचे आहे, म्हणून चांदणी चौकाजवळील एनडीए रस्त्यावर दोडके फार्मच्या जवळ नेले. तेथे त्यांच्यात वाद होऊन विनयसिंहने रागाच्या भरात मोठा दगड निखिलच्या डोक्यात घातला व गळा आवळून त्याचा खून केला. याचा कोणाला सुगावा लागू नये म्हणून त्याने रस्त्याच्या कडेला एका छोट्या खड्ड्यात मृतदेह पुरून ठेवला. व त्याच्यावर दगड-माती टाकून ते कोणाला समजणार नाही, अशा पद्धतीने त्याच्यावर कडेचा राडारोडा टाकला. या कामी दुसरा आरोपी हृषीकेश यानेदेखील मदत केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
घरी परत येऊन आरोपी विनयसिंह याने काही झालेच नाही, या अविर्भावात त्याच्या कुटुंबीयांकडे येणे-जाणे चालूच ठेवले. शेवटी पोलिसी खाक्या दाखवताच त्याने हत्येची कबुली दिली. बुधवारी सकाळी त्याने पोलिसांना मृतदेह पुरल्याची जागा दाखवली.
नातेवाइकांचा पोलीस ठाण्याला घेरावमयताचे कुटुंबीय मूळचे बेळगाव येथील महाराष्ट्र व कर्नाटकच्या सीमाभागातील आहेत. बुधवारी सकाळी गुन्हा उघडकीला आल्यावर मयत कुटुंबीयांचे नातेवाईक व गावकडील संघटनेचे नागरिक मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यासमोर जमले. त्यांनी आरोपीस ताब्यात देण्याची मागणी लावून धरली. जमाव वाढत असल्याचे पाहून सहायक पोलीस आयुक्त बाजीराव मोहिते व येथील निरीक्षकांनी या भागात बंदोबस्त वाढवला. आरोपीस कोणतीही दयामाया न दाखवता प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यची विनंती त्यांनी पोलिसांना केली. संध्याकाळी उशिरापर्यंत मृतदेह उत्तरीय तपासणी होऊन न आल्याने पोलीस ठाण्यासमोरील गर्दी रस्त्याने जाणाºया नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते.