लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : पुण्याच्या आदित्य बिर्ला हॉस्पिटलमधून शनिवारी (दि़२७) सायंकाळी किडनी घेऊन निघालेली अॅम्ब्युलन्स अवघ्या अडीच तासांत अपोलो हॉस्पिटलमध्ये पोहोचली़ पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल यांनी केलेल्या ग्रीन कॉरिडोअरमुळे हे शक्य झाले़ विशेष म्हणजे महामार्गावर काम सुरू असतानाही चिंचोली फाटा ते अपोलो हॉस्पिटल हे अंतर अॅम्ब्युलन्सने केवळ २० मिनिटांमध्ये पार केले़पुण्याच्या आदित्य बिर्ला हॉस्पिटलमधून सायंकाळी साडेसहा ते सात वाजेच्या सुमारास अॅम्ब्युलन्स (एमएच १५, इएफ ००६२) किडनी घेऊन नाशिकला निघाली़ या अॅम्ब्युलन्सला पुणे शहर, पुणे ग्रामीण पोलीस, नगर ग्रामीण पोलीस, नाशिक ग्रामीण पोलीस यांच्या सहकार्यामुळे रात्री चिंचोली फाट्यावर पोहोचता आले. शहर पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपनिरीक्षक सिरसाठ, चालक ढाकणे, काकड, जाधव यांच्या पथकाने या अॅम्ब्युलन्ससाठी वाट करून दिली़शहर पोलिसांच्या सहकार्यामुळे चिंचोली फाटा, सिन्नर फाटा, बिटको, जेलरोड मार्गे नांदूर नाका, स्वामीनारायण मंदिर ते अपोलो हॉस्पिटलपर्यंतचा मार्ग अवघ्या २० मिनिटांमध्ये पार करीत ९ वाजता ही अॅब्युलन्स अपोलो हॉस्पिटलमध्ये पोहोचली़ नाशिकरोड, उपनगर, आडगाव व पंचवटी पोलीस ठाण्याची सीआर मोबाइल व्हॅन, वाहतूक शाखेचे पोलीस यांच्या सुयोग्य नियोजनामुळे ही अॅब्युलन्स वेळेत दाखल झाली. तर नागरिकांनीही या ग्रीन कॉरिडोरला चांगले सहकार्य केले.
...अडीच तासांत पुण्याहून किडनी नाशिकला
By admin | Published: May 28, 2017 10:07 PM