पुणे : किडनी ट्रान्सप्लॉटसाठी १५ लाख रुपयांचे आमिष दाखवून किडनी काढून घेतल्यानंतर पैसे न देता फसवणूक केल्याचा आरोप महिलेने केला आहे. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. रुबी हॉल क्लिनिकनेही याबाबत चौकशीची मागणी करणारे पत्र पोलिसांना दिले आहे.
त्यामुळे किडनी तस्करीचा हा धंदा उघडकीस आला आहे. याबाबत रुबी हॉल क्लिनिकच्या एका वतीने सुरक्षा अधिकारी रवी कुमार यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यास पत्र दिले आहे. त्यानुसार, रुबी हॉल क्लिनिकमध्ये २४ मार्च रोजी किडनी ट्रान्सप्लॉटची शस्त्रक्रिया करण्यात आली. २९ मार्च रोजी किडनी दान करणाऱ्या महिलेने आपले नाव सुजाता साळुंखे असल्याचा इन्कार केला. त्यासाठी तिने आपले आधारकार्ड सादर केले असून, ही महिला कोल्हापूर जिल्ह्यातील राहणारी आहे.
याबाबत कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक वेताळ यांनी सांगितले की, रुबी हॉल क्लिनिक व या महिलेचे पत्र मिळाले आहे. याबाबत ससूनचे अधिष्ठाता व ऑर्गन ट्रान्सप्लॉट समितीला चौकशी करण्यास सांगण्यात आले आहे. त्यांच्या अहवालानंतर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे.
या महिलेच्या तक्रारीनंतर रुबी हॉल क्लिनिकने पोलिसांना पत्र दिले. त्यात किडनी ट्रान्सप्लॉन्टसाठी आवश्यक असलेल्या सर्व कागदपत्रांची विभागीय समितीने तपासणी करून त्यानंतर शस्त्रक्रिया करण्यास परवानगी दिली आहे. त्यानंतरच ही शस्त्रक्रिया झाली आहे. यामध्ये अन्य लोक सहभागी असल्याचा संशय असून, त्यांचा शोध घेण्याची विनंती पत्रात केली आहे.
पोलिसांना दिले पत्र-
महिलेनेही पोलिसांना पत्र दिले आहे. किडनी देण्यासाठी आपल्याला १५ लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, हे पैसे मिळाले नसून, आपली फसवणूक झाल्याचे सांगितले.
प्रत्यारोपणापूर्वी डोनर आणि रेसिपियंट आपली कागदपत्रे हॉस्पिटलमध्ये जमा करतात. ससूनमधील रिजनल ओथॉरायझेशन कमिटीकडे ही कागदपत्रे जमा केली जातात, कागदपत्रांची पडताळणी केली जाते. मुलाखत घेतली जाते आणि त्यानंतर परवानगी दिली जाते. या घटनेमध्ये महिलेकडून हॉस्पिटलची फसवणूक करण्यात आली आहे. प्रत्यारोपण करताना महिलेने वेगळ्या नावाची कागदपत्रे जमा केली. डिस्चार्जच्या वेळी मात्र वेगळे नाव अंतर्भूत करण्याची विनंती केली. कोणतीही कागदपत्रे नसताना अशा प्रकारे नाव बदल करणे शक्य नसते. महिलेकडे वेगवेगळ्या नावाची दोन आधारकार्ड आहेत. महिलेने आमची फसवणूक केल्याने आम्ही तिच्याविरोधात कोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
अॅड. मंजूषा कुलकर्णी, कायदेतज्ज्ञ