आव्हाळवाडी (पुणे) : वाघोलीतील केसनंद रोड येथील सिट्रॉन सोसायटीजवळील लेबर कॅम्पमध्ये दारू पिताना झालेल्या वादातून मित्राच्या डोक्यात गॅस सिलिंडर घालून खून केल्याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. दोघेही खून करून फरार झाल्यानंतर एकाला तुळजापूर, तर दुसऱ्याला लातूरहून परत वाघोलीत आल्यावर पकडले. खून केल्यानंतर राम सुभाष श्रीराम/श्रीरामे (वय २२, मूळगाव रा. मुखेड, जि. नांदेड) व गोपाल ज्ञानोबा कोतलापुरे (वय २६, रा. महादेवनगर, जि. लातूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कामावरून काढून टाकल्याचे; तसेच काम केल्याचे पैसे देण्याच्या वादातून शैलेश ऊर्फ शैलेंद्र मंडगीकर (वय २२, मूळगाव देगलूर, जि. नांदेड) याचा २२ ऑगस्टच्या रात्री डोक्यात गॅस सिलिंडर घालून चेंदामेंदा करीत निर्घृणपणे खून केला होता. खून केल्यानंतर दोघे फरार झाले होते.
दोघेही गावी जाण्याची शक्यता असल्याने एक पथक नांदेडच्या दिशेने रवाना करण्यात आले. तुळजापूर येथील एका नातेवाइकाकडे जाण्याची शक्यता गृहीत धरून एक पथक तुळजापूर येथे पाठविण्यात आले. त्या ठिकाणी तपास पथकाचे प्रमुख सहा. पोलिस निरीक्षक गजानन जाधव त्यांच्या पथकातील पोना. विनायक साळवे, पोना. स्वप्नील जाधव यांनी पाळत ठेवून आरोपी तुळजापूर येथे येताच त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता दुसरा साथीदार गोपाल लातूर येथे गेल्याची माहिती मिळाली. त्याच्याही मागावर दुसरे पथक रवाना करण्यात आले. मात्र, दुसरा आरोपी हा वाघोलीला परत येत असल्याची माहिती पोना रितेश काळे यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली. त्यानुसार खून केल्यानंतर राम सुभाष श्रीराम/श्रीरामे (वय २२, मूळगाव रा. मुखेड, जि. नांदेड) व गोपाल ज्ञानोबा कोतलापुरे (वय २६, रा. महादेवनगर, जि. लातूर) दोघे फरार झाले होते. तपास पथकाचे अंमलदार विनायक साळवे व मल्हार सपुरे यांनी सापळा रचून वाघोलीतील चोखी ढाणी परिसरातून त्यास ताब्यात घेतले. अवघ्या ४८ तासांत लोणीकंद तपास पथकाने गुन्हा उघडकीस आणला आहे. तपास लोणीकंद पोलिस करीत आहेत.