पुणे : पूर्ववैमनस्यातून एका व्यक्तीच्या डोक्यात लाकडाचे जबर प्रहार करून त्याचा खून केल्याच्या प्रकरणातील आराेपींपैकी तीन जणांची सत्र न्यायाधीश जयंत राजे यांनी शुक्रवारी निर्दोष मुक्तता केली.
विकास लाेणे असे मयत व्यक्तीचे नाव आहे. त्याच्या खून प्रकरणातील सूरज मोहन पुजारी, हर्षवर्धन उर्फ भोऱ्या जगताप व मुकेश होणखंडे अशी निर्दोष मुक्तता झालेल्यांची नावे आहेत. ही घटना ६ फेब्रुवारी २०१६ रोजी रात्री ११ च्या सुमारास भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत महाराणा प्रताप चौक, आंबेगाव पठार येथे घडली. २०१६ पासून सर्व आरोपी येरवडा कारागृह येथे बंदिस्त होते. या केसमध्ये एकूण १७ साक्षीदार सरकारी पक्षाकडून तपासण्यात आले होते. एकूण ३ प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी घटना पहिली होती. त्यापैकी पीयूष भरम याने आरोपींविरुद्ध न्यायालयात साक्ष दिली होती. तसेच आरोपी सूरज पुजारी याच्याकडून मारहाणीसाठी वापरलेले, रक्त लागलेले लाकडी वासे जप्त करण्यात आले होते आणि या पंचनाम्याचे चित्रीकरण करण्यात आले होते. तिन्ही आरोपींतर्फे ॲड. विपुल दुशिंग व ॲड. मयूर दोडके यांनी साक्षीदारांची उलट तपासणी घेतली व अंतिम युक्तिवाद केला.
अंतिम युक्तिवादादरम्यान प्रत्यक्षदर्शी साक्षीदार पीयूष भरम याचा पुरावा आरोपींना खुनासारख्या गंभीर प्रकरणात शिक्षा देण्याइतपत विश्वासार्ह नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणण्यात आले. तसेच निवेदन पंचनाम्याचे चित्रीकरण म्हणजे तपासी अधिकाऱ्याने केलेला बनाव असल्याचा युक्तिवाद करण्यात आला होता. दि. ६ फेब्रुवारी रोजी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार उपलब्ध असूनही, त्यांचे जबाब दि. ८ फेब्रुवारी रोजी घेण्यात आल्याने संपूर्ण सरकार पक्षाच्या केसमध्ये संशय निर्माण झाल्याचे न्यायालयास आरोपीतर्फे सांगण्यात आले. हा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आले.