पुणे : मार्केटयार्डात हापूस आंब्याच्या पहिल्या टप्प्यातील हंगामाला सुरूवात झाली असून गुरूवारी (ता.१८) सकाळी आडते असोसिएशनचे सचिव करण जाधव यांच्या पेढीवर पावस (जि.रत्नागिरी) येथील शेतकरी समीर हरचिरकार यांच्या बागेतील ५ डझनच्या पेटीची आवक झाली झाली. हंगामातील पहिल्या पेटीची विधीवत पूजा करून हंगामाचा प्रारंभ झाला असून, पहिली पेटी युवराज काची यांनी २३ हजार रूपयांना खरेदी करून सुरुवात केली.
यंदाच्या हापूस हंगामा बाबत करण जाधव म्हणाले,‘‘ यावर्षी अवकाळी पाऊस, थंडीची कमतरता यामुळे मोहोर कमी लागल्याने सुरूवातीच्या टप्प्यात हापूसची आवक कमी राहणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील मोहोराचा हंगाम जोमत राहण्याचा अंदाज आहे. हंगामातील आवक टप्प्याटप्प्याने वाढेल. साधारण १० फेब्रुवारी पासून दररोज ५० पेट्यांची आवक सुरू होऊन, मार्चमध्ये मोठी आवक होईल. यानंतर दुसऱ्या बहाराच्या आंब्याची मुबलक आवक एप्रिल मे महिन्यात होईल.‘‘
यावेळी शेतकरी समिर हरचिरकार म्हणाले,‘‘ आमची ६० झाडे असून, पहिल्या टप्प्यातील पहिली पेटी आज पुण्यात पाठविली. सध्यातरी हवामान चांगले असून, थंडी पडायला सुरू झाल्याने दुसऱ्या बहारातील आंब्याचे चांगले उत्पादन मिळेल असा अंदाज आहे.‘‘