यात इंग्रज सैन्याने अत्याचार करत निरपराध माणसे मारली, मंदिरे पाडली. यामुळे जनतेने चिडून इंग्रजांच्या छावणीला घेराव घातला. मणिपुरी सैन्याधिकारी जनरल थेंगल यांच्या आदेशाने क्विंटनसह तीन इंग्रजांना तत्काळ मृत्यूदंडाची शिक्षा दिली गेली. अधिकाऱ्यांना मारल्यामुळे इंग्रजांकडून मणिपूरवर हल्ला होणार हे लक्षात घेऊन टिकेंद्रजित सिंहांनी सैन्याची विभागणी करत पाओना ब्रजवासी हे निवृत्त मेजर, तसेच जनरल थेंगल यांच्याकडे जबाबदारी दिली. इंग्रजांच्या आक्रमणाला तोंड देण्यासाठी टिकेंद्रजित सिंह यांच्या नेतृत्वाखाली मणिपुरी सैन्य सिद्ध झाले. जुलै १८९१ मध्ये इंग्रजांनी पुन्हा मोठा हल्ला केला. इम्फाळमध्ये आलेल्या प्रचंड सैन्यापुढे मणिपुरी सैन्याचा निभाव लागला नाही. दरम्यान, टिकेंद्रजित सिंह इंग्रजांच्या हाती सापडले. त्यांच्यावर लुटुपुटीचा खटला चालवत १३ ऑगस्ट १८९१ रोजी राजद्रोहाच्या आरोपाखाली अवघ्या ३४ वर्षांच्या वीर टिकेंद्रजित सिंह व जनरल थेंगल यांना फाशी दिले गेले. पूर्वेकडील प्रदेशावर सहज विजय मिळविता येईल, या इंग्रजांच्या कल्पनेला टिकेंद्रजीत सिंह यांच्यासारख्या राजांनी आपल्या पराक्रमाने मोठ्ठाच धक्का दिला.
मणिपूरचा राजा टिकेंद्रजित सिंह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 4:15 AM