पिंपरी : परदेशात नोकरी लावतो असे सांगून फसवणुक केल्याप्रकरणी भोसरी पोलीसांनी आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील (Aryan Khan Drugs Case) एनसीबीचा मुख्य साक्षीदार किरण गोसावी (Kiran Gosavi) याला सोमवारी (दि. २२) अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता २७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. किरण प्रकाश गोसावी (वय ३६, रा. ठाणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. विजयकुमार सिद्धलिंग कानडे (वय ३३, रा. शिवशंकर कॉलनी, चक्रपाणी वसाहत, भोसरी) यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार, भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
फिर्यादी कानडे हे नोकरी शोधत होते. एका जॉब पोर्टल वरून त्यांना ई-मेल आला. गोसावी याने कानडे यांना ब्रुनेई येथे नोकरी लावतो, असे सांगितले. त्यासाठी अडीच लाख रुपये फी सांगितली. नोकरीची गरज असल्याने कानडे यांनी ठाणे येथील कार्यालयात जाऊन गोसावीला वेळोवेळी पैसे दिले. त्यानंतर नोकरी पक्की झाली आहे. विमानाचे तिकीट आणि व्हिसा पाठवला. मात्र, त्यानंतर गोसावी याने कानडे यांचे कॉल उचलणे बंद केले. त्यानंतर कानडे यांना गोसावीचा कोणताही ठावठिकाणा मिळत नव्हता.
कूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात किरण गोसावीचे नाव आल्यानंतर आणि टिव्हीवर गोसावीची बातमी पाहिल्यावर फसविणारा किरण गोसावीच आहे याची खात्री कानडे यांना झाली. त्यानंतर कानडे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली. पुणे शहर पोलीसांनी लष्कर आणि फरासखाना पोलीस ठाण्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यात गोसावी याला अटक केली. दरम्यान, भोसरीतील फसवणुक प्रकरणात भोसरी पोलीसांनी गोसावी याला सोमवारी (दि. २२) अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता २७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.