पुणे : आर्यन खान ड्रग्ज (Aryan Khan Drugs Case) प्रकरणात एनसीबीकडून साक्षीदार करण्यात आलेल्या किरण गोसावी (Kiran Gosavi) यांच्याविरुद्ध लुक आऊट नोटीस काढल्यानंतर आता पुणे पोलिसांनी (Pune Police) त्याच्या महिला मॅनेजरला अटक केली आहे. शेरबानो मोहम्मद इरफान कुरेशी (वय २७, रा. गोवंडी, मुंबई) असे तिचे नाव आहे.
गोसावी याने नोव्हेंबर २०१७ ते मार्च २०१८ या काळात नोकरीच्या आमिषाने अनेक तरुणांची फसवणूक केली. किरण गोसावी याने आपल्या फेसबुकवर मलेशियात हॉटेलमध्ये नोकरीची संधी अशी पोस्ट टाकली होती. त्याला चिन्मय देशमुख या तरुणाने प्रतिसाद दिला होता. त्यांच्याकडून ३ लाख रुपये घेऊन किरण गोसावी याने मलेशियाला पाठविले. मात्र, तेथे नोकरी न दिल्याने ते भारतात परत आले. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात मे २०१८ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, गेल्या ३ वर्षात त्याचा तपास झाला नव्हता. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणामुळे किरण गोसावी हा पुन्हा प्रकाशात आल्याने या गुन्ह्यात तपास सुरु झाला. नुकतीच फरासखाना पोलिसांनी किरण गोसावी याच्याविरुद्ध लुक आऊट नोटीस काढली होती.
याबाबत फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी सांगितले की, गोसावी याने नोकरीच्या आमिषाने अनेक तरुणांना आर्थिक गंडा घातला आहे. त्याने तरुणांकडून घेतलेले पैसे शेरबानो हिच्या बँक खात्यावर आल्याचे पोलिसांना आढळून आले आहे. त्यानुसार तिला अटक करण्यात आली आहे.
पालघर, मुंबईसह दिल्लीतही फसवणूक
किरण गोसावी याने पुण्यासह पालघर, मुंबई तसेच दिल्ली, आंध्र प्रदेश येथील तरुणांची फसवणूक केली आहे. एनसीबीच्या छाप्यात किरण गोसावी दिसून आला होता. तेव्हापासून ही जुनी प्रकरणे पुन्हा प्रकाशात आली असून दिल्ली पोलीसही त्याचा शोध घेत आहेत.