धायरी : गेल्या सात दिवसापासून इन्कम टॅक्सचा (Income Tax) छापा सुरू आहे. हा भारत देशातील सर्वात मोठा छापा असून ७ दिवसानंतरही पवार परिवाराची ' टोटल ' अजून लागली नाही. ठाकरे आणि पवारांना आता निरोप देण्याची वेळ आली आहे. किरीट सोमय्या हे फक्त नाव नसून चळवळ आहे. तुम्हा पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या पाठिंब्याने महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त केल्याशिवाय राहणार नाही. कितने आदमी थे नाही तर पवार साहेब कितने पैसे है, गिन गिन के हिसाब लेंगे असं म्हणत किरीट सोमय्यानीं (Kirit Somaiya) पवार कुटुंबियांवर निशाणा साधला. पुण्यात खडकवासला विधानसभा मतदारसंघात झालेल्या भाजप (bjp) पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
तसेच महाविकास आघाडी (mahavikas aghadi) सरकारच्या मंत्र्यांनी केलेल्या गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराविरुद्ध असणारी लढाई कायम ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार भिमराव तापकीर, भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक, भाजप खडकवासला मतदारसंघाचे अध्यक्ष सचिन मोरे आदींसह लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
थेट अजितदादांनाच 'चॅलेंज '
जरंडेश्वर साखर कारखान्याचे मालक पवार कुटुंबीय आहेत. सात कंपन्यांनी कारखाना ताब्यात घेतला आहे. बहिणींच्या नावाने अश्रू ढाळू नका, अजित पवार व पवार कुटुंबीय आता उत्तर द्या, असे म्हणत किरीट सोमय्या यांनी थेट अजितदादांना चॅलेंज केले.
सुप्रियाताईंनी केलेल्या विकासकामांसाठी सेल्फी स्पर्धा घेऊ
महाविकास आघाडीच्या भ्रष्टाचाराचे प्रकरणे घेऊन किरीटजी राज्यभर फिरत आहेत, जनतेचाही त्यांच्या या कार्याला मोठा पाठिंबा मिळत असल्याचे सांगत खडकवासला मतदारसंघातील भाजप पदाधिकारी मेळाव्यात बोलताना भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक म्हणाले की, खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मतदारसंघात किती विकासाची कामे केली आहेत. त्यांनी केलेले एक तरी विकासकाम दाखवा, वाटल्यास त्यांच्यासाठी आता आम्ही विकासकामांची सेल्फी स्पर्धाही घेऊ.