पडळकरांचा बारामती दौरा पुढे ढकलला
बारामती : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा आमदार गोपीचंद पडळकर, बाळा भेगडे यांच्यासह गुरुवारी (दि ९) बारामती येथील आयोजित दौरा पुढे ढकलण्यात आला आहे.
सोमय्या आणि आमदार पडळकर हे दोघे राजकीय पटलावरील महत्त्वाचे नेते आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या माहेरघरी हे नेते कोणावर तोफ डागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, गुरुवारी होणारा दौरा सध्यातरी स्थगित करण्यात आला आहे. सध्या स्थगित केलेला दौरा पुढील आठवड्यात होणार आहे.
याबाबतची अधिक माहिती भाजपचे जिल्हा सरचिटणीस अविनाश मोटे यांनी दिली. सोमय्या यांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी असलेल्या बजरंग खरमाटे यांना लक्ष्य केलेले आहे. त्यांच्या संपत्तीबाबत माहिती गोळा करण्यासाठी सोमय्या यांनी नुकतीच सांगली येथे काही दिवसांपूर्वी भेट दिली आहे. आता सांगलीपाठोपाठ याच पार्श्वभूमीवर सोमय्या बारामती भेटीला येणार होते. प्रादेशिक परिवहन अधिकारी खरमाटे यांच्या काही मालमत्तांच्या खरेदीचे बारामती तालुका ‘कनेक्शन’ असल्याबाबतची आवश्यक कागदपत्रे सोमय्या यांच्यापर्यंत पोहोचली आहेत. बारामती भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी खरमाटे ‘कनेक्शन’च्या पार्श्वभूमीवर आवश्यक माहिती जमादेखील केली. ती तातडीने सोमय्या यांना पाठविण्यात आली आहे. मात्र, बारामतीची ही माहिती पोहोचण्यापूर्वी मावळ, मुळशीसह पुणे येथील माहिती सोमय्या यांच्याकडे पोहोचली आहे. त्यामुळे सोमय्या हे गुरुवारी मावळ, मुळशीसह पुणे दौऱ्यावर जाणार असल्याचे मोटे यांनी सांगितले.
त्यामुळे सोमय्या या प्रकरणाचे पूर्ण ‘पोस्टमार्टम’ करूनच शांत बसणार असल्याचे संकेत आहेत. बारामतीकर भाजप कार्यकर्त्यांनीदेखील संपूर्ण ताकद पणाला लावत आवश्यक कागदपत्रे गोळा करीत सोमय्या यांना पाठविली आहेत. सोमय्या या कागदपत्रांचे निरीक्षण करूनच बारामतीला पुढील आठवड्यात येण्याचे संकेत भाजप पदाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्याचवेळी पडळकर आणि भेगडेदेखील सोमय्या यांच्यासमवेत बारामतीला येणार आहेत. हे नेते माध्यमांशी संवाद साधणार आहेत.