किरीट सोमय्या सत्कार प्रकरण; पुण्यात भाजप शहराध्यक्षांसह २५० ते ३०० जणांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2022 02:34 PM2022-02-13T14:34:40+5:302022-02-13T14:34:58+5:30
पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांच्या साहित्याचे नुकसान केल्याप्रकरणी भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्यासह २५० ते ३०० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा महापालिकेत सत्कार करण्यासाठी बेकायदा जमाव जमवून जोरदार घोषणाबाजी करुन महापालिकेत प्रवेश केला. यावेळी पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांच्या साहित्याचे नुकसान केल्याप्रकरणी भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्यासह २५० ते ३०० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक शिवराज हाळे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन जगदीश मुळीक, बापू मानकर, राजेश येनपुरे, दीपक पोटे, धनंजय जाधव, दत्ता खाडे, गणेश घोष, प्रतीक देसरडा व इतर २५० ते ३०० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किरीट सोमय्या हे जम्बो कोविड सेंटरमध्ये गैरव्यवहार झाल्याची तक्रार महापालिका आयुक्तांना देण्यासाठी गेल्या आठवड्यात आले असताना शिवसेनेने त्यांना विरोध करुन धक्काबुक्की केली होती. त्यात ते पायऱ्यांवर पडल्याने जखमी झाले होते. शिवसेनेने विरोध केल्याने ज्या पायरीवर ते पडले. तेथेच त्यांचा सत्कार करण्याचे भाजपने ठरविले होते. त्यानुसार शुक्रवारी दुपारी किरीट सोमय्या हे महापालिकेत आले असताना परवानगी नसतानाही जगदीश मुळीक व इतर भाजपचे कार्यकर्ते बेकायदेशीरपणे महापालिकेसमोरील रामसर चौकात जमले. त्यांनी जोरदार घोषणाबाजी करुन किरीट सोमय्या यांच्या सोबत पुणे महापालिकेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांनी त्यांना तुमचा जमाव बेकायदेशीर आहे. तुम्ही येथून निघून जावा, असे आदेश दिलेले असतानाही हे पदाधिकारी व कार्यकर्ते तेथून निघून न जाता तेथेच थांबून राहिले. मोठ मोठ्याने घोषणाबाजी करुन त्यांनी सह पोलीस आयुक्त यांना जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करुन पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे साहित्यास नुकसान करण्यास कारणीभतू झाले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक माने अधिक तपास करीत आहेत.