पुणे : पुणे शहर आणि परिसरात सतत सुरु आलेल्या श्रावणसरींमुळे सिंहगड रस्त्यावरील नांदेडफाटा,किरकीटवाडी- कोल्हेवाडी रस्त्यांवर प्रचंड खड्डे झाले आहेत. हे खड्डे बुजवण्यासाठी प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी करून नागरिकांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली. अखेर वैतागलेल्या नागरिकांनी सोशल मीडियावरून पर्यटकांना खडकवासल्याला येऊ नका असे आवाहन केले आहे.
गेल्या काही वर्षांपासून सिंहगड रस्त्यावरील वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे.स्थानिक लोकप्रतिनिधींसह पालिका प्रशासनातर्फे याकडे दूर्लक्ष केले जात आहे. मात्र,रस्त्याची चाळण झाल्याने नागरिकांना दुचाकी व चारचाकी वाहनाने प्रवास करणे कठिण जात आहे.नांदेडफाटा ते कोल्हेवाडी दरम्यान रस्त्यावर जीवघेणे खड्डे पडले आहेत.शनिवारी,रविवारी व सुट्टीच्या दिवशी हजारो पर्यटक सिंहगड,खडकवासला व पानशेत येथे पर्यटनासाठी येतात.गर्दी वाढल्यामुळे स्थानिक नागरिकांसह पर्यटकांचेही हाल होतात.त्यामुळे पर्यटकांनी या पर्यटन स्थळांकडे येऊ नये,असे आवाहन किरकिटवाडी डेव्हलपमेंट फोरमतर्फे करण्यात आले आहे.त्यामुळे या भागात राहणा-या नागरिकांनी स्थापन केलेल्या किरकिटवाडी डेव्हलपमेंट फोरमच्या माध्यमातून ‘सोशल मिडियावर’रस्त्याच्या दूरावस्थेची माहिती देणारी मोहिम सुरू केली आहे.
याबाबत किरकिटवाडी डेव्हलपमेंट फोरमच्यावतीने काही ट्विटरवर नागरिकांनी प्रतिक्रियाही नोंदवल्या आहेत. इथल्या अनेक समस्या नागरिक स्थानिक खासदार सुप्रिया सुळे आणि सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनाही टॅग करत असून या रस्त्याच्या स्थितीत मात्र अद्याप कोणतीही सुधारणा दिसत नाही. किरकिटवाडी डेव्हलपमेंट फोरमचे सदस्य प्रकाश पवार म्हणाले की, रस्त्यावर प्रचंड खड्डे असल्याने दुचाकी व चार चाकी वाहने चालवतान वाहने खड्ड्यात अडकून बसतात. रस्त्यावरील खड्डे बुजवले गेले नाही तर एखाद्या नागरिकाला आपले प्राण गमवावे लागतील.त्यामुळे या रस्त्याचे तात्काळ डांबरीकरण करावे.या मागणीचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले आहे.