पुणे : लोखंडी नांगराचा फाळ बनवून औद्योगिक क्रांतीस हातभार लावणाऱ्या किर्लोस्करांनी विद्युत पंप निर्मितीमध्ये केवळ महिला कामगारांची कंपनी उभारत एक वेगळी वाट चोखाळली. तमिळनाडूतील कोईम्बतूर येथे केलेल्या प्रयोगामुळे कामाची गती वाढण्यासह कामात अधिक अचूकताही दिसून आली. त्यामुळे सांगलीतील किर्लोस्करवाडी बरोबरच, देवास, सानंद येथील कंपनीत महिला कामगारांची संख्या वाढवली जात आहे.विद्युत पंप बनविणाऱ्या किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडने २०११मध्ये कोईम्बतूर येथे कामाची सुरुवात केली. येथे शाळांमधून मुली बाहेर पडण्याचे प्रमाणही मोठ आहे. त्यांना सक्षम करण्याच्या हेतूने, या महिलांना-मुलींना प्रशिक्षण देऊन कामाची सुरुवात झाली. विशेष म्हणजे आठवी ते दहावीनंतर शाळा सोडाव्या लागलेल्या महिलांना येथे रोजगार उपलब्ध करुन दिला जातो. आज येथे दोनशे महिला कार्यरत असून, त्यातील १०५ प्रशिक्षणार्थी आणि १२ या पारंगत श्रेणीत मोडतात. किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडच्या मनुष्यबळ विभागाचे प्रमुख रवी सिन्हा म्हणाले, एकाच पद्धतीचे काम अत्यंत एकाग्रतेने करण्याची महिलांमध्ये नैसर्गिक क्षमता असते. याशिवाय महिला या कामाच्या वेळेचा अपव्यय पुरुषांच्या तुलनेत कमी करतात. तसेच, त्यांच्यात अधिक अचूकता असल्याचे कोईम्बतूर येथील अनुभवावरुन समोर आले आहे. येथील महिलांनी अवघ्या १७ सेकंदात विद्युत पम्प जोडण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याची लिम्का बुक आॅफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. साधारण हा पंप जोडण्यास २२ सेकंद लागतात. इतर केंद्रातही महिलांचा टक्का वाढविण्यात येत आहे.>शालाबाह्य विद्यार्थिनी, महिलांची निवडकोईम्बतूर येथील युनिटच्या प्रमुख लक्ष्मी यू. म्हणाल्या की, ‘शालाबाह्य विद्यार्थिनी आणि महिलांची निवड करण्यात येते. त्यांना दोन आठवड्यांचे प्रशिक्षण दिले जाते. त्यानंतर त्या प्रशिक्षणार्थी म्हणून काम करतात. विवाहानंतर जवळपास २० टक्के महिला सोडून जातात. त्यामुळे ही प्रक्रिया सातत्याने सुरु ठेवावी लागते. येथील कामाची संस्कृती भावल्यामुळे त्यातील ५ टक्के महिला पुन्हा याच कंपनीत कामाला येतात.’
‘किर्लोस्कर’मध्ये साकारली महिला कामगारांची कंपनी!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2019 4:55 AM