पुणे : माध्यमातून समाजात स्फूर्ती जागवून प्रबोधन करण्यासाठी अनेक महापुरुषांचे वर्णन केले जाते. परंतु आजच्या समाजातील चांगले कार्य करणाऱ्या व्यक्तींना समोर आणले नाही, तर चांगले कार्य हे केवळ भूतकाळापुरतेच मर्यादित राहील. संत नामदेव, संत एकनाथ यांनी कीर्तनाच्या माध्यमातूनच पापभिरु समाज निर्माण केला. वाणीच्या जोरावरच त्यांनी समाजात बदल केले. कीर्तनाची अशी अलौकिक परंपरा तरुणांनी अधिक सक्षमपणे पुढे न्यायला हवी, असे मत राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी व्यक्त केले. आफळे अकादमीतर्फे राष्ट्रीय कीर्तन सम्राट गोविंदस्वामी आफळे यांच्या जन्मशताब्दी सांगता समारंभानिमित्त श्रीरामपूरचे रेवणनाथ महाराज यांच्या हस्ते सामाजिक ऐक्य पुरस्कार प्रदान करण्यात आले. सदाशिव पेठ येथील नारद व्यास मंदिर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी व कीर्तनकार, आनंदबुवा जोशी, वासुदेव बुरसे, शाहीर हेमंत मावळे, सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, राजाभाऊ कदम आणि गोविंदस्वामी आफळे यांचे विद्यार्थी उपस्थित होते. शाल, श्रीफळ, भेटवस्तू आणि ११ हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते.सामाजिक कार्यकर्ते उदय जगताप यांना गडचिरोलीमधील नक्षलग्रस्त गावांमधील सामाजिक कार्यासाठी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड आणि कारागृह प्रशासनाचे दक्षता अधिकारी राजेंद्र जोशी यांना सामाजिक ऐक्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच ह. भ. प. आनंदबुवा जोशी यांना कीर्तनसेवेसाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी मिलिंद गायकवाड आणि राजेंद्र जोशी यांनी पुरस्काराची रक्कम येरवडा कारागृहातील प्रेरणापथ या उपक्रमासाठी दिली. तर उदय जगताप यांनी नक्षलग्रस्त भागातील मुलांकरिता पुरस्काराची रक्कम वापरणार असल्याचे सांगितले.उदय जगताप म्हणाले, समाजातील अनेकांना मदतीची गरज आहे. परंतु नक्षली भागातील लोकांना मदतीची प्रामुख्याने गरज आहे. समाजाने पुढाकार घ्यायला हवा.
कीर्तनाची परंपरा पुढे न्यावी : चारुदत्त आफळे; पुण्यात गोविंदस्वामी आफळे जन्मशताब्दी सांगता समारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 12:27 PM
वाणीच्या जोरावरच त्यांनी समाजात बदल केले. कीर्तनाची अशी अलौकिक परंपरा तरुणांनी अधिक सक्षमपणे पुढे न्यायला हवी, असे मत राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी व्यक्त केले.
ठळक मुद्देश्रीरामपूरचे रेवणनाथ महाराज यांच्या हस्ते करण्यात आले सामाजिक ऐक्य पुरस्कार प्रदानसमाजातील अनेकांना मदतीची गरज : उदय जगताप