पुणे : ९८ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाध्यक्षाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ रंगकर्मी कीर्ती शिलेदार यांची गुरूवारी एकमताने निवड झाली. ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांच्यानंतर तब्बल सात वर्षांनी पुण्यातील ज्येष्ठ रंगकर्मीला संमेलनाध्यक्षपदाचा मान मिळाला आहे. ज्येष्ठ रंगकर्मी जयमाला शिलेदार यांनीही नगर येथे झालेल्या ८३व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते. त्यामुळे नाट्य संमेलनाच्या इतिहासात आई आणि मुलगी अशा दोघींना हा सन्मान मिळण्याची पहिलीच वेळ आहे. येत्या १३ ते १५ जूनला मुंबईमध्ये हे नाट्य संमेलन होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कीर्ती शिलेदार यांचे नाव चर्चेत होते. परिषदेच्या निवडणूकांमुळे संमेलनाध्यक्षपदासह संमेलन तारखा आणि स्थळ घोषित करण्यास विलंब लागला होता. मात्र ६ एप्रिलला मध्यवर्ती नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रसाद कांबळी यांची निवड झाल्यानंतर मुंबई येथे गुरूवारी नियामक मंडळाच्या कार्यकारिणीची पहिली बैठक पार पडली. यंदा संमेलनाध्यक्षपदासाठी नियामक मंडळाकडे कीर्ती शिलेदार, सुरेश साखवळकर आणि श्रीनिवास भणगे असे तीन अर्ज आले होते. नियामक मंडळाच्या बैठकीत कीर्ती शिलेदार यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झाले. यापूर्वी पुण्यातील ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांची २०११ मध्ये सांगली येथे झालेल्या नाट्य संमेलनाध्यक्षपदी निवड झाली होती. तब्बल सात वर्षांनी हा मान पुण्याला मिळाला आहे. कीर्ती शिलेदार यांनी आई आणि वडिलांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रीय संगीताची आराधना करीत दहाव्या वर्षी रंगभूमीवर पहिले पाऊल टाकले. पुणे विद्यापीठातून साहित्य शाखेची पदवी कीर्ती शिलेदार यांची भूमिका असलेल्या नाटकांचे आजवर ४००० हून अधिक प्रयोग झाले आहेत. देशातल्या मराठी रसिकांसाठी त्यांनी देशाच्या विविध शहरात मराठी संगीत नाटकांचे प्रयोग केले. संगीत कान्होपात्रांसह जुन्या नाटकातल्या गाण्यांचा गोडवा त्यांनी नव्या पिढीपर्यंत पोहोचविला. रंगभूमीवर भूमिका रंगवताना त्यांनी नेहमी अभ्यासपूर्ण सौंदर्यशोध घेतला. त्यामुळेच त्यांच्या भूमिका आगळ्या आणि वैशिष्टयपूर्ण ठरल्या. त्यांनी ‘स्वर ताल शब्द संगती’ या नावाचे हे संशोधनात्मक पुस्तक लिहिले आहे.