पुणे: दिल्लीत महिन्यापेक्षा जास्त काळ सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून पुण्यातून काही कार्यकर्ते दिल्लीत किसान ज्योत यात्रा नेत आहेत. समता भूमीत महात्मा फुले यांना अभिवादन करत मंगळवारी सकाळी या यात्रेची सुरूवात झाली.
इनक्रेडिबल किसान और मजदुर मंचचे अस्लम इसाक बागवान, प्रसाद बागवे, राजेंद्र भहाळकर, अॅड. संतोष म्हस्के, नितिन बसरूर, बदी उजेमा, अॅड. असिम सरोदे, बोदी रामटेक, सचिन आल्लाट, विना कदम, सुनीती सु. र.,विनय र. र. या वेळी उपस्थित होते. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला शेतकरी आंदोलनावरून समज दिली त्याचे स्वागत करण्यात आले. किमान आता तरी सरकार शेतकऱ्यांचे म्हणणे समजावून घेईल अशी आशा व्यक्त करण्यात आली.
ही यात्रा गुजरात, हरियाना, राजस्थान या मार्गाने दिल्लीत जाणार आहेत. ही यात्रा प्रजासत्ताक दिन राजस्थानमध्ये साजरा करतील. ठिकठिकाणची शेतीतील माती बरोबर घेऊन ही माती ३० जानेवारीला दिल्लीत राजघाटावर महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळी अर्पण करण्यात येणार आहे, अशी माहिती कार्यकर्त्यांनी दिली. यात्रेला सुरूवात करण्यापुर्वी पोलिसांच्या गोळीबारात हुतात्मा झालेल्या २४ शेतकऱ्यांचे स्मरण करत त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे यांनी हिरवा झेंडा दाखवत यात्रेला सुरूवात करून दिली.