यदु जोशीते पुणे शहरात तीन वेळा आमदार होते, तिथेच वकिली करायचे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, जनसंघ आणि मग भाजप असा त्यांचा प्रवास. निष्कलंक चारित्र्याचे धनी असलेले रामभाऊ म्हाळगी हे आजही महाराष्ट्रातील भाजप परिवारात दीपस्तंभ मानले जातात. खरे तर त्यांना पुण्यातच राजकारण करायचे होते, तिथे ते आमदारही झाले, पण १९७७ च्या जनता लाटेत जनसंघाने आदेश दिला की ठाणे लोकसभा मतदारसंघात लढा. पुण्यावर त्यांचा नैसर्गिक दावा होता, पण तेव्हाचे समाजवादी नेते मोहन धारिया यांना पुण्यातून लढवायचा निर्णय झाला आणि रामभाऊ ठाण्यात गेले. तेथे जिंकलेदेखील. जनता लाटेचा त्यांना फायदा झाला हे खरे असले तरी १९८० मध्ये आलेल्या इंदिरा लाटेत देशातील जनता पक्ष, भाजपचे अनेक दिग्गज पराभूत झाले, पण रामभाऊंनी ठाण्याचा गड राखला.
हल्ली सगळेच आमदार, खासदार त्यांचे कार्य अहवाल प्रकाशित करत असतात. पण त्याची सुरुवात केली ती रामभाऊंनी. ते दरवर्षी त्यांच्या लोकप्रतिनिधी म्हणून केलेल्या कामगिरीचा अहवाल मतदारांसमोर सादर करत. जनतेशी निगडीत असा कोणताही विषय नव्हता, जो त्यांनी धसास लावण्याचा प्रयत्न केला नाही. ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बेडकांना मारून त्यांचे पाय निर्यात करण्याचे प्रकार खूप वाढीस लागले होते. तेव्हा त्यांनी या विषयाचा अभ्यास केला, बेडकांना मारणे हे शेतीसाठी कसे मारक आहे याची मांडणी संसदीय समितीसमोर केली आणि ते प्रकार रोखले. असे एरवी लोकप्रतिनिधींना न सुचणारे विषयही त्यांनी हाताळले. लोकसंग्रहासाठी वेळप्रसंगी संताप गिळण्याची सवय नेत्यांनी लावून घेतली पाहिजे असे ते म्हणत.जनसंघाचे खासदार त्या वेळी कमी होते म्हणून राज्यातील चार मोठ्या शहरांमध्ये त्यांनी स्वत:ची जनसंपर्क कार्यालये सुरू केली होती. त्यातून ते स्थानिक नागरिक, कार्यकर्ते यांचे प्रश्न मार्गी लावत. एखाद्या मतदाराचे गाऱ्हाणे त्यांनी विधानसभेत वा संसदेत मांडले तर त्याला काय उत्तर मिळाले, ते त्या मतदाराला कागदपत्रांसह पाठवत असत. ते सतत कार्यमग्न असत. भ्रष्टाचार हा केवळ पैशांचा नसतो तर वेळेचा अपव्यय हाही एक प्रकारचा भ्रष्ट आचार आहे असे ते म्हणत. ते नियमितपणे दैनंदिनी लिहीत असत. प्रामाणिक इच्छाशक्ती, अखंड निर्धार आणि चिवट प्रयत्नशीलता या आधारावर यशस्वी होता येते, असे त्यांच्या दैनंदिनीच्या सुरुवातीला ठळकपणे लिहिलेले असायचे. निवडणुकीत जिंकलो तर काय करायचे याचे नियोजन अनेकांकडे असते, पण हरलो तर काय करायचे याचे नियोजनदेखील रामभाऊंकडे आधीच केलेले असायचे.
१९८० मध्ये ते लोकसभा जिंकले. त्यानंतर काहीच दिवसांत त्यांनी जाहीर केले की १९८१ मध्ये मला वयाची साठ वर्षे पूर्ण होतील. मात्र, माझी खासदारकी १९८५ पर्यंत आहे, तोवर मी खासदार राहणार आणि नंतर कोणतीही निवडणूक लढणार नाही. मला सामाजिक, राजकीय क्षेत्रात उत्तम कार्यकर्ते तयार व्हावेत यासाठी संस्था उभारायची आहे. ज्येष्ठ संघ स्वयंसेवक नानाजी देशमुख यांचा आदर्श त्या बाबतीत त्यांच्यासमोर होता. मात्र, रामभाऊ म्हाळगी यांचे १९८२ मध्ये कर्करोगाने निधन झाले. त्यांच्या इच्छापूर्तीसाठी संघ, भाजप परिवाराने मुंबईजवळील उत्तन येथे प्रशिक्षण संस्थेची उभारणी केली, आज तीच रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी देशात नावारूपास आली आहे.