- राजू इनामदार
आपण काम करत असलेल्या पक्षाची अधिकृत उमेदवारी जाहीर होणे म्हणजे तिकीट मिळणे. बहुसंख्य राजकीय कार्यकर्त्यांची धडपड त्यासाठीच सुरू असते. पक्षामध्ये अनेकजण यासाठी कार्यरत असतात, तिकीट कोणा तरी एकालाच मिळणार असते. अशी स्पर्धा असेल तर हे तिकीट मिळवणे महामुश्किल काम.
गिरीश बापट हे पुण्यातील भारतीय जनता पक्षाचे सर्वेसर्वा. ४ वेळा नगरसेवक, त्यानंतर सलग ५ वेळा आमदार अशी त्यांची कारकिर्द होती. दिल्लीत जायचा प्रयत्न त्यांनी आधीही केला होता; पण त्यांचा पराभव झाला. त्यानंतर सन २०१४ मध्ये त्यांचे मिळालेले तिकीट राज्यातील एका नेत्याने कापले होते. सन २०१९ मध्ये ते पुन्हा प्रयत्न करत होते.
बापट यांचे वैशिष्ट्य होते, राजकारणात त्यांनी कोणाशी फार टोकाची कटुता येऊ दिली नाही. त्यामुळे ते जाहीरपणे, ‘मला खासदार व्हायचे आहे, मी तिकीट मागतो आहे’ वगैरे म्हणत नसत. त्यामुळे त्यांच्याच पक्षाच्या आधीच्या खासदारांशी त्यांचे संबंध उत्तम होते. त्यांना विरोध, किंवा जाणीवपूर्वक आपला गट तयार करणे, त्याच्या माध्यमातून विद्यमान खासदारांना त्रास देणे, पक्षात दबावगट तयार करणे, असे उद्योग त्यांनी कधीच केले नाहीत.
बैठकीत गुफ्तगू
शक्तिप्रदर्शन करणे, लॉबिंग करणे याचीही गिरीश बापट यांना गरज नव्हती. त्यामुळे ते शांत होते. कार्यकर्तेच अस्वस्थ झाले होते. राज्यातून केंद्रात गेलेल्या एका केंद्रीय नेत्याचा पुणे दौरा झाला. बापट यांनीच त्यांचे स्वागत केले होते. जंगली महाराज रस्त्यावरील एका लहानशा पण खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या हॉटेलमध्ये ते या नेत्याला घेऊन गेले होते. तिथे त्यांचे बराच वेळ गुफ्तगू सुरू होते. तेवढाच काय तो त्यांचा दिल्ली संपर्क, तोही पुण्यातूनच झालेला.
कार्यअहवाल प्रकाशन
नेहमीप्रमाणे आपल्या कारकिर्दीच्या कार्यअहवालाचे प्रकाशन त्यांनी दिमाखात केले. मंत्र्यांची असावी अशीच ही कार्यअहवाल पुस्तिका होती. झगझगीत, देखणी, आर्ट पेपरवर छापलेली, महागडी व केंद्रीय तसेच राज्यातील नेत्यांच्या छायाचित्रांचा भरणा असलेली. बापट आता पुस्तिका घेऊन दिल्लीत जाणार व तिकीट मागणार, अशी चर्चा सुरू झाली. कार्यकर्तेही त्यांच्या मागे लागले. ‘भाऊ, चला दिल्लीत जाऊ. भेटीगाठी करू, तुम्हाला तिकीट देणे त्यांना टाळता येणार नाही.’
तिकीट फायनल
कार्यकर्त्यांचा आग्रह असला तरी बापट मात्र ‘थोडे थांबा’ असेच म्हणत हाेते. एक-दोन दिवसांतच बापट यांना रात्री उशिरा दिल्लीहून फोन आला. ‘दिल्लीत येण्याची गरज नाही. तिथेच थांबा.’ दुसऱ्या दिवशी भाजपची उमेदवार यादी प्रसिद्ध झाली. त्यात पुणे शहर लोकसभेचे उमेदवार म्हणून गिरीश बापट यांचे नाव होते. एका लहानशा बैठकीतून, तीसुद्धा पुण्यातच झालेल्या, कोणताही त्रास न घेता आणि कोणालाही कसला त्रास न देता, बापट यांनी ही तिकिटाची मोहीम पार पाडली होती.
- गप्पाजीराव