- राजू इनामदार
सुरेश कलमाडी हे भारतीय वायूदलात स्क्वॉर्डन लीडर होते. १९७१ च्या युद्धात त्यांनी खास कामगिरी केली होती. तिथून परतल्यानंतर त्यांनी पुण्याच्या राजकारणात प्रवेश केला. युवक काँग्रेसच्या माध्यमातून काँग्रेसचे चांगले संघटन केले. हळूहळू त्यांनी पुण्याच्या राजकारणात स्वत:चा प्रभाव निर्माण केला. दिल्लीच्या राजकीय वर्तुळातही स्वत:ची अशी एक वेगळी ओळख तयार केली. असे असताना दिल्लीच्या काँग्रेसी राजकारणातून सन १९९८ ला त्यांना बराच मोठा राजकीय धक्का बसला. आपल्याला लोकसभेची उमेदवारी नाकारणार, याची कुणकुण त्यांना लागली. त्यानंतर लगेचच त्यांनी ‘पुणे विकास आघाडी’ या नावाने एक स्वतंत्र आघाडीच तयार केली हाेती.
महापालिकेतील काँग्रेसचे तब्बल ५० नगरसेवक कलमाडी यांच्याबरोबर आले. तरीही त्यांना विजयाची खात्री वाटत नव्हती. त्यावेळी शिवसेना-भाजपा युती जोरात होती. त्यांच्या जागा वाटपात पुण्याची जागा भाजपाकडे आली होती. त्यांना फक्त एकदाच, १९९१ मध्ये अण्णा जोशी यांच्या माध्यमातून विजयाची संधी मिळाली होती. यावेळी मात्र त्यांच्याकडे जिंकून येईल, असा उमेदवार नव्हता. शेवटी त्यांनी कलमाडी यांना पुरस्कृत करायचा निर्णय घेतला.
शिवसेनेची हरकत :
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणजे एकदम रोखठोक नेता. ‘कलमाडी परत काँग्रेसमध्ये जाणार नाहीत,’ याची खात्री कोण देणार? हा बाळासाहेबांचा प्रश्न होता. त्याचे उत्तर भाजपाचे त्यावेळचे कोणीही नेते देऊ शकत नव्हते. मात्र बाळासाहेब त्याबाबत आग्रही होते. आमचे शिवसैनिक, तुमचे भाजपाचे लोक त्यांचे काम करणार, त्या पाठिंब्यावर ते निवडून येणार. त्यानंतर ते पुन्हा काँग्रेसमध्ये गेले तर त्याची जबाबदारी कोण घेणार? असे ठाकरे यांचे म्हणणे होते. अखेर कलमाडी यांच्याकडून ‘ते परत काँग्रेसमध्ये जाणार नाहीत,’ अशी लेखी हमी घेण्याचा निर्णय झाला. बहुधा बाळासाहेबांनीच ते सुचवले असावे.
निवडणुकीतील प्रेमपत्र :
कलमाडी यांनी काय लिहून दिले हे त्यांना व बाळासाहेबांनाच माहिती. खरंतर अशा पत्र वगैरेंबाबत उघडपणे बोलायचे नाही, असा राजकारणात एक संकेत असतो. पण बाळासाहेब थेट बोलणे आणि थेट टीका करणे यासाठीच प्रसिद्ध होते. कलमाडी यांना भाजपा-शिवसेना पुरस्कृत करणार हे जाहीर करण्यासाठी जी पत्रकार परिषद झाली, त्यात बाळासाहेबांनी, ‘आम्हाला त्यांचे प्रेमपत्र मिळाले, त्यात त्यांनी ‘मी परत कधीही काँग्रेसमध्ये जाणार नाही,’ असे लिहून दिल्याचे स्पष्टपणे सांगितले.
ठाकरी कडकडाट :
कलमाडी यांनी त्याचा इन्कार केला. या निवडणुकीत बरंच काही घडलं. त्यात कलमाडींनी मुंबईत घेतलेल्या बाळासाहेबांच्या भेटीचाही समावेश होता. त्याहीवेळी बाळासाहेबांनी कडक शब्दांमध्ये त्यांची हजेरी घेतली होती. नंतर पुण्यात बाळासाहेबांची कलमाडी यांच्यासाठी एक प्रचारसभा झाली. त्यातही त्यांनी असे काही शब्द वापरले की, त्याचा कलमाडींना फायदा होण्याऐवजी तोटाच झाला. त्या निवडणुकीत कलमाडी यांचा पराभव झाला. नंतर ते काँग्रेसमध्ये जाऊन पुण्यातूनच लोकसभेला निवडूनही आले. पण ते ‘प्रेमपत्र’ आणि काही खास ‘ठाकरी’ शब्द मात्र गाजलेच.