- राजू इनामदार
जुन्नर तालुक्यामधील नारायणगाव येथील निवडणुकीची ती प्रचारसभा. वक्ते होते प्रा. रामकृष्ण मोरे. मोरे सर बोलण्यासाठी प्रसिद्ध होते. कार्यकर्त्यांचा खूप मोठा संच त्यांच्यामागे प्रत्येक तालुक्यात, गावात होता. गावकऱ्यांनी सभेची तयारी जोरात केली होती. मंडप, व्यासपीठ, खुर्च्या असा नेहमीचा सरंजाम होताच. वारंवार माइक टेस्टिंग, माइक चेक वगैरे सुरू होते. गावांमध्ये असे करणारे बरेच जण असतात. त्याप्रमाणे प्रकार सुरू होता.
आधीच्या सभांना उशीर
नारायणगावच्या या सभेची वेळ होती सायंकाळी ८ वाजेची. संध्याकाळनंतरच गर्दी व्हायला सुरुवात झाली. गावाबाहेरचे लोकही जमा झाले. सरांच्या सभा तर त्यादिवशी सकाळपासूनच सुरू झाल्या होत्या. सभा संपली तरी लोक सरांना सोडायचेच नाहीत. सरही मग गावाची, गावातील प्रमुख लोकांची, कार्यकर्ते, पदाधिकारी यांची चौकशी करत बसायचे. ख्यालीखुशाली तर विचारली जायचीच, पण त्याशिवाय प्रचाराचे नियोजन, कोण भारी पडतंय, कोण त्रास देतंय यांची जंत्रीही वाचली जायची. सरांना त्यावरून गावाचा साधारण अंदाज यायचा, त्यामुळे तेही यात अडकून पडायचे.
ग्रामीण बेरकीपणा
ग्रामीण भागात कायमच एक बेरकीपणा असतो. वेश बावळा परी अंतरी नाना कळा... ही उक्ती बहुधा त्यावरूनच आली असावी. राजकारणात तर नेते, कार्यकर्ते व नागरिक अशा तिघांमध्येही हा बेरकीपणा पुरेपूर उतरलेला असतो. एखाद्याला उचकून द्यावे तर ते गावाकडच्या लोकांनीच. मग तो नेता असो किंवा कार्यकर्ता, किंवा मग कार्यकर्ते अथवा नागरिकांची फिरकी घ्यावी ती गावाकडच्या नेत्यांनीच. कार्यकर्तेही काही कमी बेरकी नसतात. काहीतरी मार्मिक बोलून समोरच्याची टोपी उडवण्यात ते एकदम तयार असतात. सरही मजा घेत बसायचे.
आचारसंहितेचा धाक
जाहीर प्रचाराची मुदत होती रात्री १० पर्यंत. निवडणूक आचारसंहितेचा अमल नुकताच सुरू झाला होता. आयोगाचा कॅमेरामन किंवा मग एखादा कर्मचारी उमेदवाराबरोबर फिरत असायचा. जरा काही नियमाला सोडून झाले की तो त्याची नोंद करायचा. कॅमेरामन छायाचित्र घ्यायचा. ते जायचे निवडणूक अधिकाऱ्यांकडे. तिथून जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे. लगेचच नोटीस वगैरे यायची. त्याचा खुलासा देत बसावे लागायचे. त्यामुळे या यंत्रणेचा धाक होता.
मूकसभा
तर, सरांना नारायणगावात पोहोचायला वाजले पावणेदहा. बरोबर निवडणूक शाखेचे काही जण होतेच. आता बोलणार काय व कसे? पण, सर एकदम शांत होते. त्यांनी थोडे आवरले व थेट व्यासपीठावर गेले. समोर बरीच गर्दी. त्यांनी आपले नाव सांगितले, पक्ष सांगितला, उमेदवार आहे असे म्हणाले, व चिन्ह सांगताना फक्त हाताचा पंजा दाखवला. ‘संपली सभा’ म्हणाले व बरोबर १० वाजता व्यासपीठावरून खाली उतरले. या मूक सभेलाही मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यानंतर सरांनी गावकऱ्यांबरोबर वेगळी मैफल रंगवली हे सांगायला नकोच.
- गप्पाजीराव