- राजू इनामदार
पक्षात राहून पक्षविरोधी भूमिका घेणे बेशिस्तीचे समजले जाते. यांनी ते केले; पण काहीच कारवाई झाली नाही. इतकेच नव्हे तर त्यांनी जाहीरपणे सांगितले की, ‘मला तुम्ही उमेदवारी दिली याचा अर्थ तुमच्या भूमिकेला माझा पाठिंबा आहे, असे नाही. मला जे वाटेल ते बोलण्यास मी मोकळा आहे!’ तरीही त्यांनाच उमेदवारी देण्यात आली. त्यांच्या विरोधात एक मोठी आघाडी उभी राहिली. तीन-तीन उमेदवार उभे केले गेले. तरीही तेच निवडून आले. तो त्यांचा स्वत:चा हक्काचा मतदारसंघ नव्हता तरीही! त्यांचे नाव आहे केशवराव जेधे.
नुकतीच त्यांची १२८वी जयंती साजरी झाली. त्यानिमित्त त्यांचे हे स्मरण. सन १९२२ पासून ते राज्यात सामाजिक व त्यानंतर राजकीय चळवळीत होते. लोकांनी उत्स्फूर्तपणे त्यांना ‘देशभक्त’ अशी पदवी दिली होती. ते पुण्यातले; पण काँग्रेसने त्यांना सन १९५७ मध्ये बारामतीमधून निवडणूक लढवण्याचा आदेश दिला. त्यांनीही तो मान्य केला; पण ‘मला जे वाटेल ते बोलण्याचा माझा हक्क मी राखून ठेवत आहे!’ असे जाहीरपणे सांगूनच.
संयुक्त महाराष्ट्र समिती :
काँग्रेसने द्वैभाषिकाचे (गुजरातसह महाराष्ट्र) समर्थन केले होते. संयुक्त महाराष्ट्र समितीने स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मागणी केली होती. ही समिती जेधे यांच्याच अध्यक्षतेखाली पुण्यात झालेल्या सभेत स्थापन झाली होती. समितीने काँग्रेसविरोधात सगळीकडे उमेदवार उभे केले होते. केशवरावांच्या भूमिकेमुळे समितीने त्यांच्या विरोधात कोणीही उमेदवार दिला नव्हता; पण त्यावेळच्या काही नेत्यांच्या हट्टामुळे एकदोन नव्हे तर तीन जणांनी केशवरावांच्या विरोधात स्वतंत्र उमेदवारी दाखल केली.
ना राहण्याचा खर्च, ना खाण्याचा :
केशवराव मतदारसंघातील वाड्या वस्त्यांवर फिरायचे. रात्री जिथे असतील तिथेच मुक्काम करायचे. सकाळी उठून पुढे निघायचे. चळवळींमधील सहभागामुळे त्यांचा ठिकठिकाणी संपर्क होता. खाण्याचा, राहण्याचा काहीच खर्च यायचा नाही. संपूर्ण मतदारसंघ त्यांनी याच पद्धतीने पालथा घातला. बरोबर काही कार्यकर्ते असत. तेच गावांमध्ये बैठका आयोजित करत. त्यात केशवराव बोलत. अवघ्या दोन-पाचशे रुपयांमध्ये त्यांनी ही निवडणूक लढवली. मतदारसंघातील १ लाख ४७ हजार ७२६ मते वैध ठरली. त्यातील ६३ हजार ३६४ मते केशवरावांना मिळाली. केशवराव सहजपणे निवडून आले.
साधी राहणी :
केशवराव खरे तर धनाढ्य घरातले होते. त्यांचे मोठे दोन बंधू सखारामशेठ व बाबूराव कुटुंबाचा व्यवसाय पाहात. त्यामुळेच केशवराव सामाजिक, राजकीय चळवळींना भरपूर वेळ देऊ शकत. श्रीमंती असूनही केशवराव अत्यंत साधे राहत. बहुजनांविषयी त्यांना कळवळा होता. तरुणपणापासूनच ते बहुजनांना सामाजिक, राजकीय, आर्थिक हक्क मिळवून देण्याच्या चळवळीत कार्यरत होते. त्यातही त्यांनी तत्त्वाला बाधा येईल, असे काही केले नाही. त्यातूनच त्यांची प्रतिमा तयार झाली होती.
(संदर्भ- केशवराव जेधे चरित्र, लेखक, य. दि. फडके)
-गप्पाजीराव