- राजू इनामदार
प्रचारात, सभांमध्ये जातधर्म आदी उल्लेख करायला मनाई आहे. पूर्वीही होती, मात्र त्याचे पालन फारसे होत नव्हते. पुण्यातील १९६२ ची लोकसभानिवडणूक यासाठी गाजली होती. त्यावेळी याच मतदारसंघाचे खासदार असलेले ना. ग. गोरे प्रजा समाजवादी पक्षाचे, शंकरराव मोरे काँग्रेसचे, तर प्रख्यात साहित्यिक आचार्य अत्रे अपक्ष आणि ‘कर्नाटक सिंह’ म्हणून प्रसिद्ध असलेले जगन्नाथ जोशी जनसंघाचे असे चार तगडे उमेदवार या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढत होते. या दिग्गज उमेदवारांमुळे निवडणूक एकदम चुरशीची झाली होती.
चारही उमेदवार फर्डे वक्ते होते. पुण्यात त्यावेळी भाषणांचा महोत्सवच रंगला होता. अत्रेंच्या सभा म्हणजे हशा आणि टाळ्या. मोरे प्राध्यापकी पेशाचे, गोरे मुद्देसूद मांडणी करणारे, तर जोशी गर्जना करणारे. डोके तालमीजवळ मोरे यांची एक सभा झाली. त्यापूर्वी अत्रे, जोशी, गोरे यांच्याकडून त्यांच्या त्यांच्या सभांमध्ये थोडे टवाळखोर असे बोलले जात असते. त्यामुळे काँग्रेसच्या लोकांना भीती वाटत होती की, ‘मोरे मागे पडतात की काय?’ ते सारखे मोरे यांच्या मागे लागत, ‘तुम्हीही बोला काही तरी, बोला काही तरी!’ तर त्या सभेत मोरे बोलता बोलता बोलून गेले. “आम्ही पळी पंचपात्रवाल्यांचे बोबिंल भाजून फेकून देऊ!” मराठीमधील हे नेहमीच्या वापरातील साधे वाक्य! पण ते निवडणुकीच्या प्रचारसभेत वापरले.
झाले! सगळीकडे आरडाओरड सुरू झाली. जातीयवादी बोलले, असे बोलणे शोभते का? हा आचारसंहितेचा भंग आहे वगैरे वगैरे. सगळीकडे बातम्यांमध्ये हेच वाक्य छापून आले. निषेध वगैरे काय काय सुरू झाले. काँग्रेसवाले परत घाबरले. मोरेंना म्हणाले, “दिलगिरी व्यक्त करा. खेद व्यक्त करा.” मोरे म्हणाले, “पडलो तरी बेहत्तर, पण दिलगिरी वगैरे व्यक्त करणार नाही.”
उलट झाले असे की बहुजन समाजात मोरे यांचे हे वाक्य भलतेच प्रसिद्ध झाले. ना. ग. गोरे म्हणजे सिटिंग मेंबरला पाडून चांगली ५० हजार मतांची आघाडी घेऊन निवडून आले. हे मोरे फार विद्वान होते. संसदेमध्ये त्यांचे भाषण आहे, असे समजले तर स्वत: पंडित नेहरू ते ऐकण्यासाठी म्हणून आधीच येऊन बसत असत. मोरे यांनी नंतर ‘पार्लमेंटरी डेमोक्रसी इन इंडिया, प्रॅक्टिस अँड प्रोसिजर’ हा तब्बल एक हजार पृष्ठांचा इंग्रजी ग्रंथ लिहिला. त्याला डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची प्रस्तावना आहे. ग्रंथाच्या प्रकाशनासाठी म्हणून स्वत: पंडित नेहरू खास दिल्लीहून मुंबईत आले होते.
पुण्याच्याच नाही तर राज्याच्या राजकारणाचा विकीपीडिया असलेल्या उल्हास पवार यांनी हे सांगितले, त्यावेळी गप्पाजीरावांच्या एक गोष्ट पटकन लक्षात आली की, ‘फार मोठ्या मोठ्या, विद्वान, थोर व्यक्ती पुणेकरांनी खासदार म्हणून निवडून दिल्या आहेत.’
- गप्पाजीराव