किस्सा कुर्सी का: मतमोजणी कक्षातील ‘सस्पेन्स’
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 11:23 AM2024-04-11T11:23:51+5:302024-04-11T11:24:16+5:30
पुणे लोकसभा मतदारसंघात १९८९ मध्ये बॅ. विठ्ठलराव गाडगीळ व अण्णा जोशी यांच्यात चुरशीची निवडणूक झाली...
- राजू इनामदार
उमेदवार ठरवणे, प्रचार फेऱ्या, मतदान या सगळ्यात निवडणूक असतेच, पण तिच्यातला सगळा थरार असतो तो मतदान वगैरे झाल्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणी होत असते त्या सभागृहात! त्यातही निवडणूक चुरशीची झाली असेल, तर मग असा थरार ना कोणत्या नाटकात दाखवला जात असेल, ना कोणत्या चित्रपटात! मतदान चिठ्ठ्यांवरचे असो किंवा यंत्रावरचे, मते मोजताना त्या सभागृहात सुरुवातीच्या काळात अनेकांच्या, त्यातही उमेदवाराच्या जीवाची जी काही घालमेल होत असते, ती प्रत्यक्ष पाहायलाच हवी.
पुणे लोकसभा मतदारसंघात १९८९ मध्ये बॅ. विठ्ठलराव गाडगीळ व अण्णा जोशी यांच्यात चुरशीची निवडणूक झाली. शिवसेना-भाजपची नुकतीच युती झाली होती. तोपर्यंत ‘शांत, सयंत, सभ्य’ असा असलेल्या भाजपच्या प्रचाराने शिवसेनेच्या सहभागामुळे ‘जोशिला, रंगीला आणि रांगडा’ असे स्वरूप धारण केले होते. शिवसेनेच्या शाखा-शाखांमधून अण्णा जोशी यांचे नाव गाजवले जात होते. शिवसेनेची सगळी स्टाइल भाजपच्या कार्यकर्त्यांनीही आत्मसात केली होती. ‘हा मतदारसंघ आपला बालेकिल्लाच आहे’, अशा समजुतीत असलेले काँग्रेसचे सगळे ‘जुनेजाणते’ आणि ‘नवेनेणते’ही प्रचाराच्या या वावटळीमुळे चांगलेच हादरले होते.
काँग्रेसचे प्रकाश ढेरे, बाळासाहेब शिवरकर, शरद रणपिसे वगैरे शहरातील आमदार गाडगीळ साहेबांनी उमेदवारी दिलेले, त्यांचे प्रचार प्रमुख होते भीमराव पाटोळे. शालेय वयापासून समाजवादी व काँग्रेसच्या निवडणुकांमध्ये सक्रिय असलेल्या पाटोळे यांना पुण्याचा कोपरा न कोपरा माहिती होता. अशी माहीतगार माणसे उमेदवाराला सतत बरोबर लागतात. त्याप्रमाणे पाटोळे हे गाडगीळांबरोबरच असायचे. सभा झाल्या, प्रचार फेऱ्या झाल्या, पत्रके वाटून झाली व मतदानाच्या स्लिपही वाटून झाल्या.
मतमोजणीत पुढे-मागे सुरू :
मतमोजणीचा दिवस उजाडला. बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात मतमोजणी होती. चिठ्ठ्यांचे मतदान. त्यामुळे विलंब ठरलेलाच. सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्ये गाडगीळ पुढे होते, मात्र नंतर-नंतर अण्णा जोशी यांचे मतदान वाढू लागले. एक-दोन फेऱ्यांमध्ये, तर ते पुढे गेले. गाडगीळ सायंकाळी स्वत: मतमोजणी केंद्रात आले ते अस्वस्थ होऊनच, कारण सतत कधी अण्णा जोशी पुढे, तर कधी ते असे सुरू होते. असे करत-करत अण्णा जोशी यांनी लिडही घेतला.
जिंकले गाडगीळच
नेहमी शांत असलेले गाडगीळ चिडले. ‘काय केले मी तिकीट दिलेल्या आमदारांनी?’, ‘त्यांनी काम केले की नाही?’, ‘सीट घालवली तुम्ही!’ अशी चिडचिड ते करू लागले. पाटोळे यांच्याकडून मतदान केंद्रांवरील आकडे आले की, ते त्यांच्यावरही ओरडू लागले. पाटोळे मात्र शांत होते. ‘पर्वतीमधून आपल्याला लिड मिळेल’ असं सांगत होते. गाडगीळ यांचा त्यावर विश्वास बसत नव्हता; पण पाटोळे ठाम होते. ते म्हणत होते तसेच झाले. पहाटे ४ वाजता पर्वती विधानसभा मतदारसंघाकडची मतमोजणी सुरू झाली आणि त्यामध्ये फक्त ८ हजार १८१ मतांच्या फरकाने गाडगीळ विजयी झाले. गाडगीळ यांनी पाटोळेंना मिठी मारत शाबासकीही दिली.
- गप्पाजीराव