सन १९८० ची सार्वत्रिक निवडणूक. देशभर या निवडणुकीची चर्चा होती. आणीबाणीला विरोध करून सत्तेवर आलेला जनता पक्ष अवघ्या ३ वर्षात फुटला होता. आणीबाणीमुळेच पराभूत झालेल्या इंदिरा गांधी पुन्हा नव्या ऊर्जेने झपाटून देशभर प्रचार करत होत्या. प्रत्येक राज्यात त्यांचे दौरे होत होते. दौरे, प्रचारसभा यात त्या व्यस्त होत्या. केंद्रातील सत्ता गेल्यानंतरही फाटाफूट न थांबलेल्या जनता पक्षाचे नेते बचावात्मक भूमिकेत होते, तर इंदिरा गांधी यांचा सततचा प्रवास, प्रचारसभा यातून काँग्रेसला बळ मिळत होते.
पुण्यातही त्यांची एक सभा ठरली. त्यांचे उमेदवार होते बॅ. विठ्ठलराव गाडगीळ. काकासाहेब गाडगीळ व नेहरू परिवाराचे संबंध स्वातंत्र्य चळवळीपासूनचे होते. त्यामुळे इंदिरा गांधी यांना गाडगीळ कुटुंबाची सगळी माहिती होती. त्यांनी अगदी जाणीवपूर्वक पुण्यातील ही सभा दिली होती. सभेचे स्थळ होते बाबूराव सणस मैदान. सभास्थानी इंदिरा गांधी आल्या. गर्दीने उत्स्फूर्तपणे त्यांचे स्वागत केले. व्यासपीठावर त्या बसल्या, त्यावेळी आजूबाजूला उत्सुकतेने पाहत होत्या. त्यांना काहीतरी आठवत होते, पण काय ते लक्षात येत नसावे. व्यासपीठावर मोजकीच मंडळी होती, तीही एकमेकांमध्ये व्यस्त. त्यामुळे त्यांच्यापैकी काहींना विचारावे तर तेही त्यांना शक्य होईना.
उल्हास पवार यांना बोलावले :
स्टेजवरून इंदिरा गांधी यांनी सहज खाली नजर टाकली तर तिथे त्यांना उल्हास पवार दिसले. युवक काँग्रेसच्या कामामुळे ते वारंवार दिल्लीत येत-जात. त्यामुळे त्यांचा परिचय होता. त्यांनी व्यासपीठाच्या एका बाजूस उभे असलेल्या त्यांच्या स्वीय सहायकाला बोलावले आणि पवार यांना वर येण्यास सांगितले. सचिवाने निरोप दिल्यावर पवार लगेचच वर आले. इंदिरा गांधी यांनी त्यांना विचारले, इसी मैदानपे पहले कभी मेरी सभा हुई थी क्या? पवार गप्पाजीरावांना म्हणाले, “इंदिरा गांधी यांच्या स्मरणशक्तीने थक्क झालो. ५ वर्षांपूर्वी याच मैदानावर इंदिरा गांधी यांची सभा झाली होती.” ती माहिती दिल्यावर त्यांची अस्वस्थता संपली. सौम्यसे हसून त्यांनी मान डोलावली.
झाले ते असे :
व्यासपीठावरील नेत्यांना, खाली उभे असणाऱ्या स्थानिक नेते, पदाधिकारी कार्यकर्त्यांना दिसले ते चित्र साधारण असे होते. इंदिरा गांधी यांनी उल्हास पवार यांना वर बोलावून घेतले. त्यांनी पवार यांच्या कानात काहीतरी विचारले. पवार यांनीही त्यांना काहीतरी सांगितले. तिथून पुढे दोन दिवस पुण्यातील स्थानिक नेते अस्वस्थ होते. उल्हास पवार यांच्याशी मॅडम नक्की काय बोलल्या हे कळत नसल्यामुळे ही अस्वस्थता होती. मीही त्यांना बरेच दिवस काय बोलणे झाले ते सांगितलेच नाही. मिश्किल पवारांनी गप्पाजीरावांना असे सांगितले आणि टाळीसाठी हात पुढे केला.
- गप्पाजीराव