- आणीबाणीला विरोध म्हणून मोहन धारिया हे इंदिरा गांधींना विरोध करून काँग्रेसबाहेर पडले. त्याही वेळी ते पुणेलोकसभा मतदारसंघातून निवडून गेलेले खासदार होते. तरुण तुर्क म्हणून त्यांची व चंद्रशेखर यांची प्रतिमा देशभर प्रसिद्ध होती. आणीबाणीत तुरुंगात, नंतर जनता पक्षाच्या वतीने पुण्यातून पुन्हा खासदार झालेले धारिया तत्कालीन तरुणांचे हिरो झाले होते. जनता पक्षाच्या काळात केंद्रीय वाणिज्य मंत्री म्हणून त्यांनी कामही फार चांगले केले. त्यामुळे त्यांच्याभोवती एक वलय तयार झाले होते.
पुढे चंद्रशेखर यांच्याबरोबर धारिया यांचे मतभेद झाले. ते जनता पक्षातून बाहेर पडले. जनता पक्षही फुटला. सन १९८० मध्ये लोकसभेच्या मध्यावधी सार्वत्रिक निवडणुकाच जाहीर झाल्या. त्यावेळी राज्यात पुलोदचे (पुरोगामी लोकशाही दल) सरकार होते. त्या सरकारला जनता पक्षाचा पाठिंबा होता. चंद्रशेखर व पुलोदचे मित्रत्वाचे संबंध. धारियांबरोबरही पुलोदचे तसेच संबंध. धारिया यांना पुण्यातून निवडणूक लढवायची होती.
पुण्यातून नानासाहेब गोरे
चंद्रशेखर यांना पुण्यातून नानासाहेब गोरे यांना उमेदवारी द्यायची होती. त्यांनी तसे पुलोद सरकारला सांगितले. तसे केले नाही, तर पुलोद सरकारला धोका होण्याची शक्यता होती. ना. ग. गोरे हेही धारिया यांचे तरुण सहकारीच. धारियांची नेमकी इथेच अडचण झाली. धारियांचे प्रचार प्रमुख होते भीमराव पाटोळे. त्यावेळच्या आठवणींचा विषय निघाला तेव्हा पाटोळे यांनी गप्पाजीरावांना सांगितले की, पुलोदकडून चंद्रशेखर यांचा शब्द डावलणे शक्य नव्हते. त्यामुळे गोरे यांनाच त्यांचा पाठिंबा राहील, हे स्पष्ट झाले.
पडद्याआडच्या गोष्टी
राजकारणात अनेक गोष्टी उघडपणे होत नाहीत. समोर एक आणि पडद्याआड दुसरेच असे होत असते. पुण्यातून उमेदवारीसाठी आग्रही असणाऱ्या धारिया यांना पुण्यात काय स्थिती आहे, ते लक्षात आले. त्यांनी अचानक बारामतीमधून अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला, असे पाटोळे सांगतात. एका पक्षाने त्यांना पुरस्कृत केले. यामागे कोण असेल ते उघड होते, मात्र ते नाव समोर कधीच आले नाही. धारिया यांनी मात्र त्या शब्दांवर बारामतीमधून लढण्याची तयारीही सुरू केली. त्यांना निवडून आणण्याची हमीही देण्यात आली होती. मैत्री जपण्याचाच हा प्रकार असावा, असा पाटोळे यांचा अंदाज आहे.
थेट तिसऱ्या क्रमाकांवर
धारियांचा प्रचार बारामती लोकसभा मतदारसंघात सुरू झाला. माजी केंद्रीय मंत्री, आणीबाणी विरोधक, गांधीवादी राजकारणी असे ग्लॅमर त्यांना होतेच. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार होते शंकरराव बाजीराव पाटील (काँग्रेस आय), संभाजीराव काकडे (जनता पक्ष). विरोधकांच्या एका सभेत कोणीतरी म्हणाले, ‘धारिया पुण्याचे. त्यांनी पुण्यातून व्हाया मुंबई करत थेट लोकसभेत जायचे, तर ते असे, पुणे, बारामती व्हाया दौंड करत दिल्लीत कसे पोहोचतील?’ तिथून निवडणुकीचा रंगच बदलला. त्या निवडणुकीत धारिया थेट तिसऱ्या क्रमाकांवर गेले.
-गप्पाजीराव